डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या सांगावात होळी खेळताना रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली. येथील सोसायटीतील मुले रंगीत पाण्याने भरलेले फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद घेत असताना त्यातला एक फुगा तेथेच उभ्या असलेल्या तरूणाच्या अंगावर पडला. त्यामुळे संतप्त झालेल्या एका तरूणाने फुगा फेकणाऱ्या अल्पवयीन युवकाला जाब विचारत मारहाण तर केलीच, शिवाय अंधारात नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
ही घटना गुरूवारी (दि.१३) यशवंत काॅम्पलेक्स भागात रात्री साडेआठच्या सुमारास घडली. हर्ष शिवाजी कांबळे (वय १७) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांत हल्लेखोर प्रणय जाधव (रा. यशवंत कॉम्प्लेक्स, सांगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हर्ष कांबळे हा मानपाडा रोडला असलेल्या शंकेश्वर शाळेजवळील साई विधी सोसायटीत कुटुंबासह राहतो. तर हल्लेखोर प्रणय जाधव हा तेथेच असलेल्या यशवंत काॅम्पलेक्समध्ये राहतो. गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास यशवंत काॅम्पलेक्स परिसरात होळी पौर्णिमेनिमित्त हर्ष आणि त्याचे मित्र रंगाचे फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद घेत मौजमज्जा करत होते. त्यावेळी यशवंत काॅम्पलेक्समधील प्रणय हा मौजमजेत सहभागी न होता तो दूरवर उभा होता. रंगाचे फुगे एकमेकांवर फेकत असतानाच त्यातील एक फुगा हर्षकडून चुकून प्रणयच्या अंगावर जाऊन पडला. त्यामुळे प्रणय भडकला. 'तू माझ्यावर रंगाचा फुगा का फेकला', असा जाब विचारत प्रणय याने हर्षला शिवीगाळ करत जबर मारहाण केली. त्यानंतर टी-शर्ट पकडून त्याला शंकेश्वर शाळेजवळील अंधार असलेल्या कोपऱ्यात जबरदस्तीने खेचत नेले. तेथे हर्षवर धारदार शस्राने वार केले. हर्ष जखमी झाल्याचे पाहताच हल्लेखोर प्रणय जाधव याने तेथून पळ काढला.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत हर्षला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डाव्या हाताच्या दंडाला मोठी जखम झाली आहे. प्रणय जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत यांनी तपास सुरू केला आहे.