ठाणे

Dombivli Swimmer : डोंबिवलीच्या छोट्या अन्वीची मोठी गोष्ट! 10व्या वाढदिवसानिमित्त पोहून पार केले 17 कि.मी. सागरी अंतर

अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटर सागरी अंतर 2 तास 44 मिनिटांत पूर्ण केले.

पुढारी वृत्तसेवा

सुनील सकपाळ

मुंबई : डोंबिवलीची अन्वी शैलेश सुवर्णा ही अवघी 10 वर्षांची चिमुरडी. खेळण्याचे वय असूनही जिद्दीच्या बळावर तिने 21 नोव्हेंबर 2025 रोजी तिने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटर सागरी अंतर 2 तास 44 मिनिटांत पूर्ण केले. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विक्रम करत तिने स्वतःलाच अनोखी भेट दिली.

अन्वी हिची आई सौम्या सुवर्णा हिने त्या रात्रीचा दिनक्रम आणि लेकीच्या विक्रमाच्या आठवणी आपल्या मनात साठवून ठेवल्या आहेत. 27 नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस. यंदाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे तिने ठरविले. आम्ही कुटुंबातील सात जण, एक निरीक्षक आणि दोन प्रशिक्षक असे सर्व जण गुरुवारी रात्री 9 वाजता डोंबिवली येथून मोरा जेट्टी येथे गेलो. तिथून बोटीने अटल सेतू समुद्रावर मध्यरात्री दोन वाजता येथे पोहोचलो. अटल सेतू समुद्रावर ईश्वराची मनोभावे प्रार्थना करून आन्वी ही 2.26 वाजता समुद्रात उतरली आणि 5.11 मिनिटांनी ती गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचली. प्रस्तावित 17 कि.मी.चे अंतर तिने 2 तास 44 मिनिटांत पार करून नवा विक्रम रचला. इतक्या कमी वयात खडतर समुद्री प्रवास केल्याने तिचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्हालाही तिचा अभिमान वाटतो, असे अन्वीची आई सौम्या हिने सांगितले.

वास्तविक पाहता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह आजुबाजूच्या भागांमध्ये थंडीचा जोर वाढला होता. मात्र, माझ्या वाढदिवसाला प्रस्तावित अंतर पोहून जायचे, असा निर्धार आन्वीने केला होता. तिने तशी मानसिक तयारी केली होती. तिचा निर्धार आणि जिद्द पाहता आम्ही आणि प्रशिक्षकांनी तिला अडवले नाही, असे सौम्या सुवर्णा म्हणाल्या.

दीड वर्षाची असताना पोहण्यास सुरुवात

डोंबिवलीकर अन्वी ही मूळची दक्षिण मंगळुरूची आहे. तिच्या वडिलांचे घर समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे. लहानपणापासून ती पोहायला भीत नाही. दीड वर्षाची असताना ती पोहायला शिकली. दहा वर्षीय अन्वी ही डोंबिवली एमआयडीसी येथील ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीमध्ये शिकत आहे.

पुढील लक्ष्य 40 कि.मी. सागरी अंतर पार करण्याचे

17 कि. मी. सागरी प्रवास अंतर पार केल्यानंतर आन्वीने 40 कि.मी. अंतर पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने ती सराव करत आहे. अन्वी ही डोंबिवली येथील यश जिमखाना येथील स्वीमिंग पूलमध्ये प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT