Crime News Pudhari
ठाणे

Dombivli Crime | डोंबिवलीत कडेवर मुलीला घेऊन महिला टोळीची बंगल्याची रेकी, सीसीटीव्हीत प्रकार कैद

मिलापनगरातील बंगल्यात दोन महागड्या मोबाईलसह पर्स लंपास

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Bungalow Recce

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगर बंगलो परिसरात दिवसा ढवळ्या महिलांच्या टोळीने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेराद्वारे उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये एकच खळबळ माजली आहे. दिवाळीच्या सणाच्या दिवसांत अशा महिलांकडून आणखी चोऱ्या होण्याची शक्यता वर्तवली जात असून रहिवाशांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मिलापनगर बंगलो परिसरातील आर एल १०५ या बंगल्यात ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तीन तरुण महिला प्रथम बंगल्याची रेकी करण्यासाठी आल्या. त्यातील एका महिलेच्या कडेवर लहान मुलगी होती. त्यामुळे कुणीही त्यांच्यावर संशय घेणार नाही अशी त्यांची शक्कल होती. रेकी केल्यानंतर त्यातील एकीने बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. तेथे कुणी नाही हे बघून कडी न लावलेला दरवाजा उघडून ती थेट खोलीत शिरली.

बंगल्यातील राहणारी व्यक्ती दुसऱ्या खोलीत असल्याने तिला ही चोरी झालेली घटना ताबडतोब समजली नाही. या संधीचा फायदा घेत चोरट्या महिलेने खोलीत ठेवलेले दोन भारी किंमतीचे मोबाईल आणि पर्स घेऊन पलायन केले. पर्समध्ये अंदाजे एक हजार रूपये होते. अवघ्या काही मिनिटात ही टोळी मोबाईल आणि पर्स घेऊन पसार झाली. हा संपूर्ण प्रकार बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या घटनेबाबत ज्यांच्याकडे चोरी झाली त्यांनी मानपाडा पोलिसांकडे सीसीटीव्हीचे फुटेज देऊन तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोरट्या महिलांचा शोध सुरू केला आहे. मागे काही महिन्यांपूर्वी अशीच महिलांची टोळी पहाटे चार/पाच वाजण्याच्या दरम्यान येऊन निवासी भागातील बंगले/इमारतीच्या आवारात शिरून चोऱ्या करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरातून दिसले होते.

आता या तीन तरुण महिला दिवसा फिरून चोरीचे प्रयत्न करीत असल्याने रहिवाशांनी खबरदारी घ्यावी, घराचा दरवाजा कडी लावून बंद ठेवावा, अनोळखी महिलांना घरात प्रवेश देऊ नये, संशयास्पद महिला दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT