Crime News pudhari photo
ठाणे

Dombivli Crime : महिलेला पाठवले अश्लील व्हिडिओ

हिंदुत्ववादी संघटनेचा बडा पदाधिकारी अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीतील एका बड्या हिंदुत्ववादी संघटनेत काम करणाऱ्या महिलेने रामनगर पोलिसांकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे. संघटनेत काम करणाऱ्या महिलेला तिच्या व्हॉट्स ॲपवर अश्लील व्हिडिओ पाठविणारा हिंदुत्ववादी संघटनेचा बडा पदाधिकारी अडचणीत आला आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या महिलेसोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे डोंबिवलीत एकच खळबळ माजली असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका बड्या संघटनेत काम करणाऱ्या महिलेने या संदर्भात रामनगर पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा देखील त्याच संघटनेत पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.

यातील तक्रारदार महिला ही डोंबिवली परिसरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक आणि संघटनात्मक कामांमध्ये नेहमीच पुढे असते. विशेषतः लव्ह जिहादसारख्या अत्यंत संवेदनशील प्रकरणांसह महिलांच्या जनजागृती मोहिमांमध्ये ती सक्रियपणे सहभाग घेत असते. समाजकार्यात सतत व्यस्त राहणाऱ्या या महिलेसोबत तिच्याच संघटनेतील व्यक्तीने असे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

महिलेला मानसिक त्रास देण्याच्या आणि तिची छळवणूक करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर (व्हॉट्स ॲप) अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ पाठवले होते, असा आरोप महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेने तातडीने रामनगर पोलिस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आरोपीवर काय कारवाई होते, याकडे तक्रारदार महिलेच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT