डोंबिवली : शहराला जोडून असलेल्या आजदे गावातल्या जयराम स्मृतीच्या पाण्याची टंचाई बोंब आजही तशीच आहे. पश्चिम डोंबिवलीत तर काही प्रभागांपैकी सह्याद्रीनगर, राजूनगर, सरोवरनगर, गरिबाचा वाडा, साईनगर, शंकेश्वरनगर, तसेच महालक्ष्मी चौक परिसरात पाणी अत्यंत कमी दाबाने वितरीत करण्यात येत असल्याने रहिवाशांना गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही भागांत दिवसाला अवघ्या एका तासापेक्षाही कमी वेळ पाणी मिळत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत या भागात वाढीव टँकर देण्याची मागणी रहिवाश्यांकडून होत आहे.
पश्चिमेला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे त्या भागातील रहिवासी भयंकर त्रस्त झाले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून टँकरद्वारे होणारा पुरवठाही वेळेवर व पुरेसा नसल्याने रहिवाशांना खासगी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. खासगी टँकरसाठी दोन ते अडीच हजार रूपये मोजावे लागत असल्याने कर भरूनही पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा ? असा सवाल गृहिणींकडून उपस्थित करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तर पहाटेच्या सुमारास पाणी येत असल्याने गृहिणींना घरकाम आटोपून मुलांना शाळेत पाठविणे, तसेच इतर दैनंदिन कामे सांभाळणे कठीण होत आहे.
शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत राजू नगर व गरिबाचा वाडा परिसरात पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने त्या कधी पूर्ण होतील ? याबाबत अनिश्चितता आहे. शिवाय या टाक्या पूर्ण झाल्यानंतर पश्चिम डोंबिवलीत त्या भरण्यासाठी आवश्यक अतिरिक्त जलवाहिन्या व वितरण व्यवस्थेचा ठोस आराखडा अद्याप दिसून येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. सदर भागासाठी पाण्याचे वितरण सुरळीत होईपर्यंत रहिवाशांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर वाढवून ते नियमितपणे मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी पुढे आली आहे. या संदर्भात एका माजी नगरसेवकाने केडीएमसीआयुक्त अभिनव गोयल यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. आता निवडणुका झाल्या आहेत...नगरसेवक निवडून आले आहेत...अशांनी आपापल्या भागातील समस्यांचे निराकरण करून त्या सोडविणे अपेक्षित असताना सत्कार करवून घेण्यात अनेक महाशय गुंतल्याचे ठिकठिकाणी दिसून येते.
आजदे गावातल्या जयराम स्मृतीत पाण्याचा ठणाणा
डोंबिवलीला जोडून असलेल्या आजदे गावातील जयराम स्मृती या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात नाकाम ठरलेल्या केडीएमसी प्रशासनाचा चोहोबाजूंनी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या भागात राहणाऱ्या एका ज्येष्ठ रहिवाश्याने चक्क पाण्यावाचून तडफडत मरण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावण्यासाठी राहत्या इमारीतीचा गच्चीवर जाऊन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नशीब बलवत्तर म्हणून अन्य रहिवाश्यांनी चपळाईने आत्महत्येपासून परावृत्त केल्याने त्या रहिवाश्याचे प्राण वाचले आहेत. याच गावातील शेवटच्या टोकाला असलेल्या जयराम स्मृतीमध्ये नेहमीच पाण्याचा ठणाणा झालेला असतो. या सगळ्याला मोरेश्वर राणे नामक अधिकारी कारणीभूत असल्याचे रहिवासी सांगत आहेत. या संदर्भात राणे यांनी मिश्किल उत्तर दिले आहे.
अधिकाऱ्यांच्या उत्तराने रहिवासी अवाक्
एमआयडीसीकडून अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या गुरूत्व वहिणीवर आजदे गाव शेवटी आहे. २४ तासांतून फक्त ६ तास कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यातच जयराम स्मृती परिसराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ८० एमएम व्यासाची (अत्यंत कमी व्यासाची) असून ही जलवाहिनी सदोष आहे. शिवाय जलवाहिनीच्या शेवटच्या भागात जयराम स्मृतीचे नळ कनेक्शन आहे. सदर जलवाहिनी १५० एमएम व्यासाची टाकणे आवश्यक आहे. जलवाहिनी सक्षम व्यासाची टाकल्याशिवाय शेवटच्या नळ कनेक्शनधाराकांना अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अमृत योजनेमध्ये वितरण वाहिनीची तरतूद असल्यास तात्काळ काम होईल. मी स्वतः सर्व गावांसाठी निधीची मागणी केली होती. मात्र यावर्षीच्या यादीमध्ये आजदे गावाचे नाव नाही. आपल्या खात्री करिता चौकशी करावी. कुलकर्णी यांच्याशी चर्चा करावी, असे उत्तर केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मोरेश्वर राणे यांनी दिले आहे. काहीतरी करू...नक्की करू...चेक करतो...आज पाणी आले अशी उत्तरे देणारे या खात्याचे अधिकारी शैलेश मळेकर आणि शैलेश कुलकर्णी हे दोघेही अधिकारी जयराम स्मृतीला नियमित आणि मुबलक पाण्याचे वितरण होण्यासंदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.