डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असतानाच याद्यांचा घोळ अद्याप कायम असल्याचे पश्चिम डोंबिवलीतील प्रभाग 21 च्या यादीतून दिसून येत आहे. या प्रभागातील तब्बल 47 इमारतींतील मतदारांची नावे यादीतून गायब असून स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन सदर मतदारांची नावे यादीत समाविष्ट करावीत, याकडे केडीएमसीचे माजी सदस्य तथा मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
या संदर्भात 143 डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21/ ह चे प्रधिकृत अधिकारी तथा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे प्रल्हाद म्हात्रे यांनी 47 इमारतींची यादीच सादर केली आहे. 143 डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये असलेल्या मतदार यादीत इमारतींच्या नावांसह सदर इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची अर्थात मतदारांची नावे समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात प्रल्हाद म्हात्रे यांनी सोसायट्या, चाळी आणि इमारतींची यादीच निवेदनाच्या सोबत जोडली आहे. यादी क्रमांक 176 मध्ये नव राजाराम सोसायटी, दीपल सोसायटी, इशा सोसायटी, कैलास ज्योती (ए आणि बी विंग), धर्मा निवास, वेणू स्मृती, अश्विनी निवास, डोंबिवली नागरिक (ए, बी, सी आणि डी विंग), डोंबिवली पिपल्स, एलोरा कॉम्प्लेक्स, ओम गंगाई बिल्डिंग, डोंबिवली रहिवाशी (1-2-3-4), विष्णू भुवन, आई निवास, सुनील निवास (ए, बी आणि सी विंग), देवचंद सोसायटी, निळकंठ, जानकी निवास, साईकृपा बिल्डिंग, सुरज बिल्डिंग, भागीरथी (1-2-3), चंद्राबाई भुवन, नारायण निवास, साईधाम बिल्डिंग, राधा बिल्डिंग, साई निवास बिल्डिंग, जीवनप्रित बिल्डिंग, मुखर्जी बिल्डिंग, कैलास दर्शन (ए आणि बी विंग), आनंदी भुवन, सप्तशृंगी आणि साई सेवा बिल्डिंग या 32, यादी क्रमांक 80 मध्ये अक्षय सोसायटी, गंगोत्री, आर्य दर्शन, गोविंद सोसायटी आणि पपली सोसायटी या 5, तर यादी क्रमांक 81 मध्ये सत्यम निवास, शिवम सोसायटी, गजानन श्रद्धा, रविप्रकाश, यमुना छाया, शिवस्मृती, नंदादीप, आर्य कृपा, नीलकंठ छाया आणि कैलास दर्शन या 10 अशा एकूण 47 इमारती तथा गृहनिर्माण संस्थांचा आणि त्यात राहणाऱ्या मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश करण्यात आलेला नाही किंवा अपूर्ण स्वरूपात आहेत.