रूग्णवाहिका अडकली डोंबिवलीतील परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विळख्यात 
ठाणे

Ambulance Stuck | रुग्णवाहिका अडकली डोंबिवलीतील परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विळख्यात

व्हायरल व्हिडिओतून विदारक दृश्य चव्हाट्यावर : परप्रांतीय फेरीवाले या भागात दहशतीचा अवलंब करून करतात व्यवसाय

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Traffic | Ambulance Stuck Amid Encroachment by Migrant Hawkers in Dombivli

डोंबिवली : पूर्वेतील इंदिरा चौकापासून कामत मेडिकल पदपथ, स्टेशन परिसर, उर्सेकरवाडी, पूजा-मधुबन सिनेमागृह गल्लीपर्यंतचा संपूर्ण भाग आपल्या मालकीचा असल्याच्या अविर्भावात परप्रांतीय फेरीवाले या भागात दहशतीचा अवलंब करून व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांनी उर्सेकरवाडी जाम करून टाकली आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास उर्सेकरवाडीतील पूजा-मधुबन सिनेमागृहा समोर असलेल्या एक खासगी रूग्णालयापर्यंत रूग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलेल्या रूग्णवाहिकेचा व्हिडिओ माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून खळबळ उडवून दिली आहे. रूग्णसेवेपेक्षा फेरीवाल्यांचा कळवळा येणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर राजू पाटील यांनी निशाणा साधला आहे.

सायंकाळी घरी परतण्याच्या ओढीने स्टेशनात पाऊल टाकताच फेरीवाले डोंबिवलीकरांची वाट अडवतात. रेल्वे पूल, रस्ते, फूटपाथच नव्हे, तर हमरस्त्यांवरील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवरही फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. उर्सेकरवाडी तर फेरीवाल्यांचा मोठा अड्डा मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी सुरू आहे. फुटपाथ तर येथे आढळूनच येत नाही. फेरीवाल्यांना संपूर्ण रस्ता व्यापला आहे. दुकानांसमोर फेरीवाले अनधिकृतपणे ठाण मांडून बसले आहेत. स्थानिक फेरीवाल्यांवर देखील परप्रांतीय फेरीवाल्यांनी हुकूमत असते. वेळप्रसंगी शस्त्राचा वापर करणाऱ्या या गुंडांच्या नादी कोण लागणार ? या भीतीने केडीएमसीचा कुणीही अधिकारी कारवाईसाठी पुढाकार घेताना दिसत नाही. मात्र याच फेरीवाल्यांकडून मिळणारी मलई वरपर्यंत पोहोचत असल्याने रूरुग्णवाहिकेतील रूग्ण रूग्णालयात पोहोचला काय आणि फेरीवाल्यांच्या कोंडमाऱ्यात अडकून मेला काय ? याचे अशा अधिकाऱ्यांना काहीही देणे-घेणे नसल्याची परिस्थिती आहे.

रूग्णवाहिकेच्या चालकावर दहशत

महिन्याभरापूर्वी याच उर्सेकर वाडीत असलेल्या खासगी रूग्णालयाशी संबंधित रूग्णवाहिकेचा चालक गणेश माळी याला उन्मत्त फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर मनसेने आंदोलन करत स्टेशन परिसरातील फेरीवाले हटावची मागणी केली. केडीएमएसी प्रशासनाने महिनाभर स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त केला. मात्र आता कारवाई थंड झाली आणि फेरीवाले पुन्हा रस्त्यावर आले. त्याच उर्सेकर वाडीत असलेल्या खासगी रूग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी आलेली रूग्णवाहिका फेरीवाल्यांच्या विळख्यातून निघत नव्हती.

या व्हिडिओत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले आहेत. फेरीवाल्यांनी रस्ता व्यापला आहे. त्यात एक रूग्णवाहिका अडकली आहे. फेरीवाल्यांचा प्रश्न सत्ताधारी सोडवू शकले नाहीत. त्याचा फटका पादचारी/चाकरमान्यांसह रूग्णवाहिकांनाही बसत सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुद्धा मनाई आहे. त्‍यामुळे या या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे. पण इच्छाशक्ती कमी पडत आहे. हे आजच्या घटनेवरुन दिसून येते.

फोटो ओळ : उर्सेकरवाडीतील पूजा/मधुबन सिनेमागृह गल्लीत असलेल्या एका खासगी रूग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी आलेली रूग्णवाहिका फेरीवाल्यांच्या गर्तेत सापडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT