डोंबिवली : टिळकनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार निलेश ठिकेकर हे दारूच्या नशेत गणवेश घालून खंडाळपाडा परिसरातील फेरीवाले, दुकानदार, टेम्पोवाले, रिक्षावाले, हातगाडीवाल्यांकडून हप्ते वसूल करत असतात. ज्या भागात ड्यूटी दिली आहे त्याभागातील कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याऐवजी त्रासदायक ठरलेल्या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी रहिवासी, दुकानदार, फेरीवाले, टेम्पोवाले आणि व्यापाऱ्यांसह राजसैनिकांनी केली आहे.
जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात अंमली पदार्थांचे स्त्रोत रोखून कारवाया करत शेकडो बदमाशांना तुरुंगाचा रस्ता दाखवला आहे. पण टिळकनगर पोलिस ठाण्यात कार्यात असलेले हवालदार निलेश ठिकेकर यांना राज सैनिकांनी खंडाळपाडा परिसरात रंगेहाथ पकडले. बोलण्यासाठी तोंड उघडले असता त्यांच्या तोंडातून दारूचा वास आला. माझी ड्यूटी संपली असल्याचे सांगणाऱ्या हवालदार ठिकेकर यांचा अवतार पाहून हे पाहून त्यांना या संदर्भात मनसेचे कुणाल चौधरी, मनसेच्या कामगार सेनेचे संदीप कोमास्कर यांच्यासह परिसरातील त्रस्त रहिवाशांनी जाब विचारला. यावर हवालदार ठिकेकर यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.
याबाबत मनसेच्या वतीने लवकरच पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहाराद्वारे हवालदार ठिकेकर यांच्याकडून जनतेला होणाऱ्या दररोजच्या त्रासाची माहिती देऊन कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे कुणाल चौधरी यांनी सांगितले. जर कारवाई झाली नाही तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचा इशारा मनसेचे कुणाल चौधरी यांनी दिला.
निलंबन करण्याची मागणी
हवालदार निलेश ठिकेकर हा दारूचा नशेत तर्राट होऊन ९० फिट रोड, टाटा नाका रोड, खंडाळपाडा परिसरात असलेल्या दुकानदार, फेरीवाले, ग्रामस्थ, रहिवासी आणि पादचाऱ्यांमध्ये दहशत माजवत आहे. दुकानदार, टेम्पोवाल्यांकडून पन्नास ते शंभर रूपये, तर फेरीवाल्यांकडून वीस ते पन्नास रूपयांपर्यंतची मागणी करून हप्ते उकळत असतात. अशा भ्रष्ट आणि व्यसनी पोलिसाला पोलिस खात्यातून तात्काळ निलंबन/बडतर्फ करण्यात यावे, या मागणीकडे राजसैनिकांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर माहिती घेऊन कारवाईःपोलिस उपायुक्त अतुल शेंडे
हवालदर ठिकेकर याच्या कारनाम्याची चर्चा सोशल मिडीयात जोरात आहे. या संदर्भात पोलिस उपायुक्त अतुल शेंडे यांना विचारले असता सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.