डोंबिवली : डोंबिवलीहून ठाणे, मुंबईला जाण्यासाठी उल्हास खडीवरील मोठागाव-माणकोली उड्डाणपूल लोकार्पणा आधीच सुरू झाला. आता डोंबिवलीहून ठाण्याला जोडणार्या रेल्वे समांतर रस्त्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त अभिनव गोयल यांनी पुढाकार घेतला आहे.
या रस्त्यासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश आयुक्त गोयल यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. आमदार राजेश मोरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांसह डोंबिवली ते ठाणे समांतर रस्त्याचा विषय चर्चेला आणल्यानंतर आयुक्तांनी त्यांच्या अधिकार्यांना सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.
मुंबई-ठाणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये वाढलेली जीवघेणी गर्दी, लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करताना प्रवासी पडून होणारे अपघात यावर उपाययोजना करण्यासाठी तत्कालीन आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी डोंबिवली-ठाणे समांतर रस्त्याचा पर्याय समोर आणला होता.
समस्त डोंबिवलीकरांच्या या मागणीचा धागा पकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी लक्षवेधी आयुधाचा वापर करून सविस्तर सुचनेद्वारे अधिवेशनात सभागृहाचे लक्ष्य केंद्रित केले होते. आर्थिक टंचाईचे कारण सांगून गेल्या तीन दशकांपासून मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा-दिवा-कोपर-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे भिजत घोंगडे पडले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात या रस्त्याच्या मंजूरीसाठी असलेल्या इतर रस्त्यांची कामे देखील सुरू झाल्याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले होते. आता केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लोकलवारी म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्याचे समीकरण झाले आहे.
सकाळी गेलेली व्यक्ती पुन्हा घरी परतेल की नाही याची शाश्वती नसल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहेत. त्यामुळे अतिशय कमी वेळेत कल्याण-डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी लोकलशिवाय कोणताही पर्याय नसल्याने डोंबिवली ते ठाणे समांतर रस्ता हा काळाची गरज असल्याने या महत्त्वाकांक्षी रस्त्याचे एक पाऊल पुढे पडले आहे ही नक्कीच सकारात्मक बाब आहे.
ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरु करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बरोबरच स्मार्ट सिटीमधील बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत, गावांमध्ये पथदिवे बसवावेत. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने आणि हेल्थ सेंटर सुरु करावेत, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपांसह कमानी शुल्क देखील माफ करावे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अमृतच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरु करावा, ग्रामीण भागातील भूयारी गटारांची कामे सुरु करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली.