डोंबिवली : एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग फेरीवाल्यांविरोधात दररोज कारवाई करत असून, या कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाला युनियनने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तर दुसरीकडे, डोंबिवली पूर्वेत फेरीवाल्यांच्या दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत रामनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून दररोज पदपथावर (फूटपाथ) व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम राबवली जात आहे. मात्र, पदपथावर जागा पटकावण्याच्या आणि व्यवसाय करण्याच्या कारणावरून फेरीवाल्यांच्या विविध गटांत रोजच वाद आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. यामुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, व्हायरल झालेला हा थरारक व्हिडिओ शुक्रवारचा असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही फेरीवाले एका तरुणाला केस धरून रस्त्यावरून फरफटत नेत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत; तर आजूबाजूचे लोक मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत उभे असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.