Dombivli Ramesh Mhatre Health Deteriorates Pudhari
ठाणे

Dombivli Doctor Assault Case | शास्त्रीनगर रूग्णालय हिंसाचार प्रकरण: नगरसेवक रमेश म्हात्रे यांची प्रकृती खालावली 

एकच किडनी असल्याने प्रकृतीबाबत वाढली चिंता, आधारवाडी कारागृहातून उल्हासनगरच्या सरकारी रूग्णालयात दाखल

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Ramesh Mhatre Health Deteriorates

डोंबिवली : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची प्रकृती अचानक खालावल्याने शुक्रवारी संध्याकाळी एकच खळबळ उडाली. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात असलेल्या म्हात्रे यांना तातडीने उल्हासनगर येथील सरकारी मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक प्रकृती बिघडल्याने कारागृह प्रशासनाने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश म्हात्रे यांना पूर्वीपासूनच आरोग्यविषयक अनेक समस्या आहेत. शुक्रवारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने आधारवाडी कारागृह प्रशासनाने त्यांना रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. शास्त्रीनगर रूग्णालयातील हिंसाचार प्रकरणात अटक झाल्यानंतर रमेश म्हात्रे यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले.

दरम्यान, कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी रमेश म्हात्रे यांना रूग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. कारागृह प्रशासनाने म्हात्रे यांच्या प्रकृतीबाबत पोलिसांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे रमेश म्हात्रे यांची एकच किडनी असून त्यांना किडनीसंबंधित आजारांचाही त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

मात्र उल्हासनगर येथील सरकारी मध्यवर्ती रूग्णालयात त्यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरू आहेत ? आणि सध्या त्यांची प्रकृती कशी आहे ? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT