डोंबिवली : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांना झालेल्या मारहाण प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. एस. कातकडे यांनी हा निर्णय दिला. म्हात्रे यांना १४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती; तथापि, त्यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी (दि. १४) न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे ॲड. सी. व्ही. बावस्कर आणि ॲड. ए. पी. आडसकर यांनी म्हात्रे यांच्या जामिनाला तीव्र विरोध केला. रुग्णालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ला करणे ही अत्यंत गंभीर बाब असून, तपासाच्या दृष्टीने आरोपीला कोठडीत ठेवणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच म्हात्रे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना जामीन दिल्यास समाजात तेढ निर्माण होऊ शकते, याकडेही सरकारी वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
मात्र, म्हात्रे यांच्या बाजूने बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडले. म्हात्रे यांचे वय ७३ वर्षे असून त्यांची प्रकृती चिंताजनक असते, हा त्यांच्या जामिनाचा मुख्य आधार ठरला. बचाव पक्षाचे वकील ॲड. गणेश पाटील, ॲड. मुजाहिद काझी आणि ॲड. आनंद पत्की यांनी युक्तिवाद केला की, घटनेच्या दिवशी रमेश म्हात्रे कोणत्याही गुन्ह्याच्या उद्देशाने रुग्णालयात गेले नव्हते, तर त्यांना तिथे बोलावण्यात आले होते. रुग्णालयातील घटना दुर्दैवी असली, तरी त्यात म्हात्रे यांचा कोणताही पूर्वनियोजित कट नव्हता.
सरकारी पक्षाने म्हात्रे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा दिलेला दाखलाही बचाव पक्षाने खोडून काढला. म्हात्रे यांच्यावर दाखल असलेल्या अनेक जुन्या प्रकरणांमध्ये त्यांची न्यायालयातून आधीच निर्दोष मुक्तता झाली असल्याचा मुद्दा वकिलांनी प्रभावीपणे मांडला. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दुपारी आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रमेश म्हात्रे यांचा जामीन मंजूर केला. मात्र, याच प्रकरणातील त्यांचे खासगी अंगरक्षक रमेश लक्ष्मण पवार, प्रकाश उद्धव निकम आणि अक्षय शरद कारंडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करण्यात आली. सध्या हे तिघेही आधारवाडी कारागृहात असून, त्यांच्या वकिलांकडून लवकरच पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे.