टोळीतील २ तरूणांसह ६ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.  Pudhari
ठाणे

Dombivli Crime | डोंबिवलीत वृद्धाला लुटून पसार झालेल्या ६ जणांना अटक: चेनसह २ दुचाकी जप्त

विष्णूनगर पोलिसांची लक्षवेधी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Robbery Case

डोंबिवली : मॉर्निंग वॉकसाठी गावदेवी जेट्टी परिसरात फेरफटका मारणाऱ्या ६४ वर्षीय सुगंध मंगल्या म्हात्रे यांच्या गळ्यातील २६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरीने हिसकावून पोबारा केलेल्या सहा बादमशांच्या टोळक्याला विष्णूनगर पोलिसांनी ७२ तासांत जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या टोळीतील २ तरूणांसह ६ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या टोळीकडून चोरीची २५.२८० ग्रॅम वजनाची १ लाख रूपये किंमतीची सोन्याची चेन, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाक्या देखिल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

रविवारी २४ मे रोजी सकाळी ५.२० वाजता पश्चिम डोंबिवलीतील देवीचापाड्यात असलेल्या काळूबाई मंदिराच्या पाठीमागे राहणारे सुगंध म्हात्रे हे नेहमीप्रमाणे गावदेवी जेट्टी परिसरात फेरफटका मारायला गेले होते. दोन अनोळखी त्यांच्या पाठीमागून आले. त्यातील एकाने म्हात्रे यांच्या डोक्यात काठीचा फटका मारून त्यांना खाली पाडले व गळ्यातील सोन्याची चेन जबरीने हिसकावून पोबारा केला.

याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे यांच्यासह पथकाने तपास चक्रांना वेग दिला.

या पथकाने आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिंतन सुनिल नंदा (वय २०, रा. सागर हाईट्स, वेताळनगर) आणि मोहित सुनील जाधव (वय १९, रा. श्री समर्थ कृपा, सत्यवान चौक, डोंबिवली-पश्चिम) या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अन्य ५ अल्पवयीन मुलांसह लुटीची योजना आखल्यानंतर दुचाकीवरून रेकी करून गुन्हा केल्याची कबुली दिली. सुगंध म्हात्रे यांची लांबविलेली चेन स्वप्नील सुनील भोईर (वय २७, रा. मोठागाव, रेतीबंदर क्रॉसरोड, डोंबिवली-पश्चिम) याच्या मार्फत विकल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली.

पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले होते. बुधवारी रात्री २२.१८ वाजता पोलिसांच्या सापळ्यात अडकलेल्या चिंतन नंदा, मोहित जाधव व स्वप्नील भोईर या तिघांना अटक केली. तर त्यांच्या ६ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन भिवंडीतील बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. कल्याण न्यायालय हजर केले असता न्यायालयाने तिघांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे अल्पवयीन ६ साथीदारांची रवानगी भिवंडीच्या बालधुधारगृहात करण्यात आली आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

१) निर्जन ठिकाणी एकटे फिरण्यास जाऊ नये, मॉर्निंग वॉकसाठी चांगले उजाडल्यावरच जावे व सोन्याचे दागिने टाळावेत.

२) सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत का ? रेकॉर्डिंग होते का ? तारीख-वेळ बरोबर आहे का ? याची नियमित खात्री करावी.

३) कॅमेऱ्यांनावर धूळ बसणार नाही याची काळजी घ्यावी. कॅमेऱ्यांच्या कक्षेत झाडाच्या फांद्या, बॅनर येणार नाहीत हे पहावे.

४) कॅमेरे उंचीवर बसवावेत, जेणेकरून रस्त्यावरील वाहनांचे क्रमांक स्पष्टपणे दिसतील.

५) बहुतांश आरोपी १६ ते १८ वयोगटातील असून ते जेष्ठ नागरिकांची रेकी करून गुन्हे करतात. त्यामुळे प्रत्येकाने सतर्कता बाळगावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT