22 Thousand Books Jail Model
डोंबिवली : डोंबिवलीतील पै फ्रेंड लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी पुस्तक आदान-प्रदान कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. पूर्वेकडे असलेल्या शिवमंदिराजवळच्या सी. पी. गोयंका शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी उभारण्यात आली आहे. कलाकार सिद्धेश बागवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २२ हजार पुस्तकांचा वापर करून साकारलेली सेल्युलर जेलच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
९ ते १४ एप्रिल दरम्यान हा पुस्तक आदान-प्रदान उपक्रम सुरू राहणार आहे. वाचन संस्कृतीला चालना मिळावी, ती नव्या आणि परंपरागत वाचक वर्गात रूळावी व त्यांना पुस्तकरूपी नवा खजिना अगदी मोफत उपलब्ध व्हावा या हेतूने हा उपक्रम पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून राबविला जातो.
दरवर्षी अशा उपक्रमात पुस्तकांचा कलात्मक पद्धतीने वापर केला जातो. अशाच अफलातून असलेल्या संकल्पनेतून यापूर्वी कलाकार सिद्धेश बागवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुस्तकांचे शहर, तसेच हजारो पुस्तकांचा कलात्मक वापर करून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली होती. अश्या भन्नाट संकल्पना याआधी प्रत्यक्षात साकारून पुस्तकप्रेमींना आकर्षित करून त्यांना वाचनात गोडी रूजविण्याचे कार्य पुस्तक आदान-प्रदान उपक्रमाच्या माध्यमातून होत असते.
यंदा सुद्धा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नगरी साकारण्यात आली आहे. यामध्ये वीर सावरकरांच्या साहित्याचे विशेष दालन आहे. मात्र जेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या अंदमान येथील सेल्युलर जेलची प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तब्बल २२ हजार पुस्तकांचा कलात्मक वापर करून १८ फूट उंच आणि १६ फूट रूंदी असलेल्या सेल्युलर जेलच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत आपल्याकडील जुनी पुस्तके घेऊन यायची आणि तेवढ्याच वजनाची आपल्या आवडीची पुस्तके अगदी मोफत घेऊन जायची आहेत. पुस्तकप्रेमी वाचक मंडळींसाठी एक पर्वणी असलेला हा उपक्रम पुढील पाच दिवस सुरू राहणार आहे. आपल्या घरात वाचून झालेली जुनी पुस्तके, तसेच अडगळीत ठेवलेल्या पुस्तकांवरील धूळ झटका आणि तुम्हाला वाचायला आवडतील ती न वाचलेली पुस्तके अगदी मोफत घरी घेऊन या.
रोजच्या धावपळीत वाचनाची सवय लावल्याने मानसिक आरोग्य सुधारते, ताण तणाव कमी होतो आणि जीवनाला नवी दिशा मिळते. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आयुष्यात प्रगतीसाठी उत्तम साहित्याचे वाचन करणे आवश्यक असल्याने नक्कीच या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.