Dombivli SATIS Project Pudhari
ठाणे

Dombivli SATIS Project: डोंबिवलीच्या सॅटीस प्रकल्पाला वेग; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

एमएमआरडीए/केडीएमसीकडून संयुक्त सर्वेक्षण सुरू; रेल्वे स्टेशन परिसराचा होणार कायापालट

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसराचा कायापालट करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सॅटीस प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. खासदारांनी दिलेल्या निर्देशानंतर डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित सॅटीस प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला आहे. एमएमआरडीए प्रशासन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात संयुक्त सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे.

डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेकडे रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता हा प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

डोंबिवलीची वाढती लोकसंख्या आणि स्टेशन परिसरातील गर्दी पाहता पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए, केडीएमसी आणि संबंधित विभागांसोबत वेळोवेळी बैठका घेत सॅटीस प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनाही प्रत्यक्ष सर्वेक्षण करून प्रकल्पाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता प्रत्यक्ष संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची इमारत, रामनगर पोलिस ठाणे, विष्णूनगर पोलिस ठाणे आणि परिसरातील उपलब्ध जागांचा एकत्रित वापर करून आधुनिक सॅटीस संकुल उभारण्यात येणार आहे.

नियोजनबद्ध पद्धतीने जागांचा वापर करत रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा ताण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. सॅटीस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात मोठा बदल पहायला मिळणार आहे.

प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणात आधुनिक पार्किंग सुविधा, पादचारी मार्ग, वाहतुकीचे शास्त्रोक्त नियोजन तसेच विविध नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील दररोजची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

सततच्या तगाद्यानंतर सॅटीसला गती

डोंबिवली पूर्व-पश्चिम सॅटीस प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून एमएमआरडीए आयुक्तालयात सातत्याने बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली होती.

डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने मार्गी लावणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी वारंवार मांडली होती. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत प्रत्यक्ष संयुक्त सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार आता एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून संयुक्त सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. डोंबिवलीची वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेला भविष्यात मोठा दिलासा देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT