Dombivli News | डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम् रस्ता धूम स्टाईलसाठी तयार केला आहे का?  
ठाणे

Dombivli News | डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम् रस्ता धूम स्टाईलसाठी तयार केला आहे का? बेफाम दुचाकी एकमेकांवर आदळून एक ठार!

नागरिकांचा सवालः ठोकर मारणाऱ्याची आयसीयूत मृत्यूशी झुंज, परिसरातील रहिवाशांकडून पोलिसांत तक्रार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळच्या रिजन्सी अनंतम् गृहसंकुल परिसरातील रस्ता धूम स्टाईलसाठी आंदण दिल्याचे शनिवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातातून अधोरेखित झाले आहे. मलंगगड रोडला जोडणाऱ्या या रस्त्यावर बेफाम दुचाक्या चालवून त्या एकमेकींवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, दुसऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने तोही अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे.

आदित्य विक्रम म्हात्रे (२२) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अमिताभ गिरिजाशंकर राम (३६) हा एका खासगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या संदर्भात मानपाडा रोडला असलेल्या श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणारा आकाश रवी (१९) याने दिलेल्या फिर्यादीनुसार मानपाडा पोलिसांनी बेदरकार दुचाकीस्वार अमिताभ राम याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम २८१, १०६ सह मोटर वाहन कायद्याचे कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास रिजन्सी अनंतम् गृहसंकुल परिसरात रूस्तमजी नामक निर्माणाधीन इमारतीच्या समोर फिर्यादी आकाश रवी याचा मित्र आदित्य म्हात्रे हा त्याच्या रॉयल एनफिल्ड बुलेटवरून जात होता. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एम एच ०५/डी व्ही/९८२५ क्रमांकाच्या पॅशन-प्रो दुचाकीने यू टर्न घेत असलेल्या आदित्यच्या बुलेटला जोरदार ठोकर मारली. दोघीही दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे दोघाही दुचाकीस्वारांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. या अपघातात जबर जखमी झालेल्या आदित्यला रस्त्यावरील लोकांनी उचलून रूग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तर दुसरीकडे या अपघातात जबर जखमी झालेल्या अमिताभ राम यालाही तातडीने रूग्णालयात दाखल केले. सध्या तोही अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय कुंभार अधिक तपास करत आहेत.

रात्री-बेरात्री दुचाकीस्वारांची वर्दळ वाढली

रिजन्सी अनंतम् संकुलाच्या बाहेरील मलंग रोडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चहाचे दुकान आहे. या दुकानामुळे रात्री तरूण मुला-मुलींची त्यांच्याकडील दुचाक्यांसह प्रचंड वर्दळ असते. तसेच रात्री-अपरात्री या रस्त्यावर वेगाने दुचाकी चालविल्या जातात. परिणामी संकुलातील रहिवाशांची झोपमोड होते. या संकुलात राहणाऱ्या उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांच्यासह काही जागरूक रहिवाशांनी मानपाडा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांकरिता पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याचे लता अरगडे यांनी सांगितले.

गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना आवश्यक

आई-वडिलांचा एकुलत्या एक असलेल्या आदित्य म्हात्रे या तरूणाचा नाहक अपघात होऊन बळी गेला आहे. त्याला मागून धडक मारणारा देखील गंभीर जखमी झाला असून आयसीयूमध्ये मृत्यूच्या दारात आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. चहाच्या दुकानाला रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी कोणत्या शासन निर्णयानुसार परवानगी मिळाली आहे ? त्यांच्यावर काही निर्बंध आहेत की नाही ? पोलिस प्रशासन डोळेझाक का करत आहे ? या गंभीर समस्येवर जागरूक नागरिक म्हणून काही ठोस उपाययोजना करण्यासाठी एकत्र यायला हवे. अन्यथा भविष्यात आपल्या जवळच्या कुणाला नाहक जीव गमवावा लागेल, याचे सर्वांनी भान ठेवायला हवे, असेही आवाहन लता अरगडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT