डोंबिवली : १२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण आणि खूनाचा छडा लावण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटला मोठे यश आले आहे. कल्याण-शिळ महामार्गावरील डोंबिवली जवळच्या दावडी गावात राहणाऱ्या करण अरविंद बागूल (२३) या तरूणाचे २०१४ सालात अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता.
अत्यंत क्लिष्ट आणि पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरलेल्या या थरारक गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला असून क्राईम ब्रँचने या प्रकरणातील तिघा अपहरणकर्त्या खुन्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये कथित रीलस्टार तथा कुख्यात गुन्हेगार सुरेंद्र पाटील याचा समावेश आहे. शस्त्रांचा साठा घरात लपवून ठेवणाऱ्या या बदमाशाचा क्राईम ब्रँचने बुरखा फाडला असून त्याचा करण बागूल याच्या खुनाशी थेट संबंध असल्याचेही क्राईम ब्रँचने उघडकीस आणले आहे.
सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५), चंद्रकांत बाळाराम गायकर (३९) आणि सुरेश गोपाल देगावत उर्फ छोटू (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी २ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
४ ऑक्टोबर २०१४ रोजी मानपाडा पोलिस ठाण्यात आव्हान देणाऱ्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास गेल्या १२ वर्षांपासून रेंगाळला होता. स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचकडूनही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. मात्र काहीकेल्या या गुन्ह्याचा उलगडा करण्यात तपास यंत्रणांना यश येत नव्हते. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचा विडा उचलला. त्यासाठी वपोनि शिंदे यांनी आपल्या अनुभवाचा कस पणाला लावून सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोउपनि किरण भिसे, सपोउपनि दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, हवा. विजय जिरे, पांडुरंग भांगरे, सुधीर कदम, सचिन भालेराव, विलास कडू, सचिन कदम, आदिक जाधव, गोरक्षनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, मिथून राठोड, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, जालिदंर साळुंखे, सतिश सोनावणे, मंगल गावित, चालक सपोउपनि अमोल बोरकर यांच्या पथकाची निवड केली.
अन् सराईत गुन्हेगार पोपटासारखा बोलू लागला
या पथकाने तपास चक्रांना वेग देऊन गोपनीय माहितीच्या आधारे सुरूवातीला दावडी रोडला असलेल्या गायकर कंपाऊंडमध्ये राहणारा चंद्रकांत गायकर याला उचलले. चौकशी दरम्यान कथित रीलस्टार तथा कुख्यात गुन्हेगार सुरेंद्र पाटील याने १२ वर्षांपूर्वी केलेला संपूर्ण कट उघडकीस आला. अग्निशस्त्र साठ्यासह अटक केलेल्या सुरेंद्र पाटील याचा तुरूंगातून ताबा घेऊन क्राईम ब्रँचने चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान तो पोपटासारखा बोलू लागला. करण बागूल याच्या खुनाची त्याने कबुली दिली.
असे घडले थरारक हत्याकांड
करण बागूल हा तरूण दावडी गावात राहत होता. मुख्य आरोपी सुरेंद्र पाटील याचा करण बागूलशी जमीन व्यवहारातून वाद होता. याच वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी करणचे अपहरण करून सुरेंद्र पाटील याने त्याच्या बिल्डींग साईटवर काम करणारे साथीदार चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत उर्फ छोटू यांच्या मदतीने अपहरण करून दावडीतील कार्यालयात नेले. तेथे लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याचा खून केला. एवढ्यावरच न थांबता या तिन्ही अपहरणकर्त्या खुन्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी करणचा मृतदेह स्वतःच्या कारमधून नेऊन बारवी धरणाजवळील घनदाट जंगलात अज्ञास्थळी फेकून विल्हेवाट लावली. तीन दिवसांनी मुरबाड पोलिसांना जंगलात सापडलेला अज्ञात मृतदेह करण बागूल याचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
अंधारात लुप्त सत्य उजेडात
या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सुरेंद्र पाटील, चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत उर्फ छोटू यांच्याकडून करणाचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी रॉडही जप्त करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी सुरेंद्र पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांतून तब्बल १५ गुन्ह्यांची मालिका दाखल आहे.