Shrikant Shinde bungalow waterlogging
डोंबिवली : रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसराला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एमआयडीसीच्या दोन्ही फेजसह निवासी विभागातील रस्ते पाण्याखाली गेले, इतकेच काय तर डोंबिवलीचे प्रवेशद्वार असलेल्या विको नाक्यापासून इन्फ्रामॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सद्गुरू कृपा बंगल्याचा परिसर जलमय झालेला दिसून आला. एमआयडीसीच्या फेज एक आणि दोनमधील कारखान्यांमध्ये, तसेच निवासी विभागातील बैठी घरे, बंगले आणि सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्याने या भागातील उद्योजकांसह रहिवासी चिंताक्रांत झाले आहेत.
एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगर वंदेमातरम् उद्यान आणि सुदामानगरमधील चार बिल्डिंग, गौरीनंदन सोसायटी परिसरात मोठ्या नाल्यातील पाणी बंगल्यांसह इमारतींच्या आवारात घुसले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास परिसराला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच पुराचे पाणी घरांत घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बद्दल परिसरातील सतर्क रहिवाशांनी केडीएमसीसह एमआयडीसी प्रशासनाला कळविले आहे. रिजेन्सी अनंतम् सिग्नल आणि वंदेमातरम् उद्यानाच्या जवळील मोठ्या नाल्याच्या संरक्षक भिंतीला काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यातून निघणारे नाल्याचे पाणी रस्त्यावर पसरत आहे. जर ती भिंत कोसळली तर मोठी आपत्ती येण्याची शक्यता असल्याने आजूबाजूचे रहिवाशी भयभीत झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे एमआयडीसीच्या निवासी विभागातील रस्त्यांवरील पाणी औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांच्या आवारात घुसत आहे. काही बंगले, सोसायट्या काल रात्रीपासून जलमय आहेत. काँक्रीटचे रस्ते तयार करताना सोसायट्यांना विश्वासात घेऊन रस्ते, गटार बांधणी रस्ते ठेकेदाराने केली असती तर आता ही वेळ आली नसती अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी केली. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने आवारात पार्क केलेली वाहने पाण्याखाली जात आहे. परिणामी इंजिनमध्ये घुसलेल्या पाण्यामुळे ही वाहने नादुरूस्त होऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
चार बिल्डिंग गौरीनंदन सोसायटी परिसरातील मोठ्या नाल्यात गेल्या वर्षभरापासून पाईपलाईन शिफ्टिंग आणि नाल्याच्या रूंदीकरणाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने आता त्याचा फटका सर्वसामान्य रहिवाशांना बसत आहे. एकंदरीत निवासी क्षेत्रातील मिलापनगर, खासदार बंगला, एम्स हॉस्पिटल रस्ता, सुदर्शन नगर आणि महावितरण कार्यालय समोरील संदेश सोसायटी, इत्यादी परिसर जलमय झाला आहे. त्यातच बारवी धरण ओसंडून वाहू लागल्याने त्यातील पाणी इकडेही येण्याच्या अफवा वजा शक्यतेने रहिवासी भयभीत झाले आहेत. परिसरातील अनेक सोसायट्या, बंगले, घरांमध्ये पाणी घुसले आहे. रस्त्यांचे बांधकाम उंच झाल्याने रस्त्यावरील पाणी थेट सोसायट्यांसह बैठी घरे आणि बंगल्यांमध्ये घुसत असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे. दरवर्षी पावसाळी दिवसांत होणाऱ्या मानवनिर्मित पूरसदृश्य परिस्थितीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांवरून पावसाचे पाणी समतल दिशेने वाहत असल्याने दूरवरून एमआयडीसीत जणू काही नदी वाहत असल्याचे चित्र दिसते.
डोंबिवली एमआयडीसीत काँक्रीटचे रस्ते बांंधताना अनेक ठिकाणी गटारे लहान, रस्त्यांच्या काठी उन्नत स्तरावर आहेत. काही ठिकाणी रस्त्यालगतच्या सोसायट्या, बंगले खाली आणि रस्ता दोन ते अडीच फूट उंच झाला आहे. सोसायट्यांच्या आवारात तुंबणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने हे पाणी मिळेल त्या मार्गाने वाट काढत वाहते. सोसायट्यांमधील पाणी गटारांमधून वाहून जाईल अशी व्यवस्था एमआयडीसीमध्ये अनेक ठिकाणी आढळून येत नाही. काही ठिकाणी ही व्यवस्था ठेकेदाराने करून ठेवली आहे. सोसायट्या खाली आणि गटारांमधून पाणी जाण्यासाठी असलेले छिद्र लहान अशी स्थिती आहे. त्यामुळे डोंबिवलीतील रस्ते जलमय होत असल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून रिपरिणाऱ्या पावसाचा फटका वृक्षवल्लींनाही चांगलाच बसला आहे. पश्चीम डोंबिवलीच्या भागशाळा तथा कान्होजी जेधे मैदानातील भला मोठा वृक्ष पहाटेच्या सुमारास उन्मळला. तथापी मनसेचे ज्येष्ठ नेते तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यामुळे पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला येणाऱ्या वृद्धांना कोणतीही दुखापत झाली नाही.