डोंबिवली : पूर्वेकडील डोंबिवली ते ठाकुर्ली स्टेशनच्या समांतर नेहरू रोडला पंजाबी भाई नावाच्या बदमाशाने पोलिसांना खुले आव्हान देत जुगाराचा अड्डा थाटला आहे. सर्वाधिक वर्दळीच्या या रोडला असलेल्या शिधापत्रिका कार्यालयाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कोपऱ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून हा जुगाराचा अड्डा बिनबोभाट सुरू आहे. दिवस उजाडल्यापासून तीन पत्ती नावाचा जुगार सुरू होतो. हा अड्डा पंजाबी भाई नामक बदमाश चालवत असल्याचे मजुरांच्या नाक्यावरील चर्चेतून समोर आले आहे.
या ठिकाणी इमारती आणि घरांच्या कामासाठी लागणाऱ्या मजुरांचा नाका आहे. या नाक्यावर सकाळी जवळपास दोन ते अडीच हजार मजूर काम मिळविण्यासाठी थांबलेले असतात. याच ठिकाणी जुगार अड्डा बेमालूमपणे सुरू आहे. झटपट पैसा मिळत असल्याने या अड्ड्यावर अनेक जुगारी सकाळपासून तुटून पडलेले असतात. विशेष म्हणजे 20 ते 25 वयोगटातील तरूण या अड्ड्यावर तीन पत्ती जुगार खेळत असतात. या अड्ड्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अनेकदा या अड्ड्यावर पैशांवरून वादावादी होते. वेळप्रसंगी जुगाऱ्यांमध्ये आपसात हाणामारीच्या घटना घडत असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेहरू रोडवरील सार्वजनिक स्वच्छतागृहात, तसेच शिधापत्रिका कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या जुगार अड्ड्याचा त्रास होत असतो. तसेच मजूर नाक्यावर दोन ते अडीच हजार मजूर काम मिळविण्यासाठी सकाळपासून ते अकरा-बारा वाजेपर्यंत नाक्यावर उभे असतात. याच रोडला श्री गणेश मंदिर संस्थांनने चालविण्यास घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. या उद्यानात अबाल-वृद्ध खेळण्या-विरंगुळ्यासाठी येत असतात. तर गणेश मंदिरात जाण्यासाठी अनेक ज्येष्ठ, वृध्द आणि भाविक या रस्त्यावरून ये-जा करतात.
एकीकडे वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असलेला जुगार अड्डा पाहून या मंडळींना देखिल आश्चर्य वाटते. जुगार अड्ड्या भोवती दारूडे आणि गर्दुल्ल्यांचा विळखा असतो. तर दुसरीकडे आणखी एका गंभीर समस्येने डोके वर काढले आहे. तेथील सार्वजनिक स्वच्छतागृहात महिला-पुरूषांची ये-जा असते. होमोंच्या प्रादुर्भावामुळे स्वच्छतागृहात जाणाऱ्यांना ओशाळल्या सारखे होते. स्वच्छतागृह चालविणाऱ्याला देखिल दारूडे, गांजडू, होमो, गर्दुल्ल्यांकडून त्रासाला सामोरे जावे लागते.
बाजारहाट करण्यासाठी ये-जा करणाऱ्या गृहिणींना देखिल पंजाबी भाईच्या अड्ड्यावरील जुगारी, दारूडे, गांजाडू, गर्दुल्ल्यांचा उपद्रव होतो. जुगार अड्ड्यावर उघडपणे पैशांची उलाढाल होते. तीन पत्ती जुगार अड्ड्यावर झटपट पैसा मिळत असल्याची माहिती असल्याने डोंबिवलीतील कानाकोपऱ्यातील जुगारी या अड्ड्यावर सकाळपासून तुटून पडलेले असतात. एका भाईच्या आशीर्वादाने हा अड्डा चालविता जात असल्याचे तेथील चर्चेतून समोर आले आहे. त्यामुळे या जुगार अड्ड्याला कुणी विरोध करायला गेले की त्याला जागीच रोखले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
पश्चिम डोंबिवलीतील गोपीनाथ चौकात धवनी सोसायटीच्या समोर आणि विश्वनाथ सोसायटीलगत कचरा कुंडी आहे. त्या ठिकाणी ठिकाणच्या तळ मजल्याचे ओसाड बांधकाम आहे. रस्त्याच्या बाजूने हिरवी जाळी लावून या पडिक बांधकामातील जागेत जुगाऱ्यांनी अड्डा सुरू केला आहे. घरात अडगळ झालेले सोफे, खुर्च्यांसारखे फर्निचर नागरिक फेकून देतात. या फर्निचरचा वापर जुगाऱ्यांनी त्यांच्या अड्ड्यावर बसण्यासाठी केल्याचे आढळून येते. या अड्ड्यावर चोवीस तास जुगार खेळला जातो. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर चालणाऱ्या या अड्ड्यावर जुगारासह अंमली पदार्थांचे सेवन, ओल्या पार्ट्या केल्या जातात. जुगारात हरल्यावर किंवा नशेचा अंमल चढल्यावर हेच बदमाश आपसांत आरडाओरडा करून परिसरात शांतता भंग तर करतातच, शिवाय वेळप्रसंगी आपसांत हाणामाऱ्या देखिल करत असल्याच्या या भागातील रहिवशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या रस्त्यावरून पालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. या सर्वांना जुगार तथा ओल्या पार्ट्यांच्या या अड्ड्यामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा अड्डा उद्ध्वस्त करून तेथील जुगारी आणि नाशेखोरांच्या नांग्या ठेचून काढाव्यात अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांनी विष्णूनगर पोलिसांकडे व्यक्त केली आहे. आता पोलिस या अड्ड्यावर कधी आणि कशी कारवाई करतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.