Dombivli Auto Rickshaw Accident
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकात मंगळवारी रात्रीच्या सुमारास मद्यपान केलेल्या चालकाने त्याच्या रिक्षावरील नियंत्रण गमावल्याने एका पादचारी तरूणीला जोराची धडक दिली. या अपघातात तरूणीच्या हाताला आणि कपाळाला दुखापत झाली आहे. डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी या मद्यपी रिक्षा चालकावर कारवाई केली आहे.
रिक्षाची धडक बसताच तरूणी काही अंतरावर फेकली गेली. मात्र तिने स्वत:ला सावरले. रस्त्यावरील पादचाऱ्यांनी तिला धीर दिला आणि रिक्षा चालकाला जाब विचारला. त्यावेळी रिक्षा चालक उलटसुलट उत्तरे देऊ लागला. त्याने मद्यपान केले असल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी तातडीने डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय अहिरे यांना याची माहिती दिली.
अहिरे यांच्या सूचनेनंतर हवालदार सांगळे वॉर्डनसह घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिसांनी चौकशी केली असता रिक्षा चालकाने आपले नाव रमेश पाटील असून तो कल्याण-शिळ महामार्गावरील सोनारपाडा गावात राहत असल्याचे सांगितले. धडक बसलेली पादचारी तरूणी निराली भानुशाली ही डोंबिवली पूर्वेतील पी अँड टी कॉलनी येथील रहिवासी आहे. ती फडके रस्त्यावरून मदन ठाकरे चौकातून एचडीएफसी बँकेच्या रस्त्याने पायी जात होती. पोलिसांनी रमेश पाटील याला रिक्षासह डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेत नेले. तेथे मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी त्याच्यावर प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रेल्वे स्थानक परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाने मद्यपान करून रिक्षा चालविल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या रिक्षात प्रवासी असते किंवा अन्य वाहनाला धडक बसली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने या मद्यधुंद रिक्षा चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
संध्याकाळच्या वेळी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात अनेक रिक्षा चालक तर्राट होऊन रिक्षा चालवित असल्याच्या तक्रारी आहेत. रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही अशा चालकांवर थेट कारवाई करण्याची सूचना आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना केली आहे.