Dombivali News | डोंबिवलीत मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधात प्रवाशांचे आंदोलन 
ठाणे

Dombivali News | डोंबिवलीत मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधात प्रवाशांचे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील केळकर रस्त्यावर मानपाडा रोडकडे जाणाऱ्या रिक्षा स्टँडवर संध्याकाळच्या वेळी रिक्षा चालकांकडून प्रवासी भाडे नाकारले जात असल्याच्या मुजोरीविरोधात संतप्त झालेल्या प्रवाशांनी सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केले. लांबच्या भाड्यासाठी प्रवाशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, महिला आबाल-वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

    संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना रिक्षावाले जवळचे भाडे घेण्यास टाळाटाळ करतात. स्टँडवर रिक्षा उपलब्ध न करता चालक बाहेर उभे राहून फक्त मोठ्या रकमेच्या थेट भाड्याची वाट पाहतात. त्यामुळे तासन् तास प्रवाशांना रिक्षांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागते.

मुसळधार पाऊस किंवा गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी तोच अनुभव कायम होता. भाजपाच्या नेत्या मनीषा राणे यांना प्रवाशांनी रिक्षा चालक वेठीस धरत असल्याचे सांगितले. त्यावेळी राणे यांनी प्रवाशांसह केळकर रोडवर मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.

स्टेशन परिसरात रिक्षा तळावर रिक्षा उपलब्ध होत नसल्यास केडीएमटीने या भागात बसेस चालवून प्रवासी वाहतूक सुरू करावी. तसेच केळकर रस्त्यावरील रिक्षा तळावर सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस तैनात ठेवावेत. रिक्षा चालक रांगेत येईल त्या प्रवाशांना सोडण्याची हमी देत नाहीत, तोपर्यंत मुजोर रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT