नेवाळी : डोंबिवलीचा ऑक्सिजन झोन धोकादायक स्थितीत आहे. या परिसरात वन्य जीवांसाठी अत्यंत त्रासदायक दुर्गंधीयुक्त वायू आणि जल या परिसरात तयार होत आहे. उल्हासनगर शहरातून हद्दपार झालेले जीन्स कारखाने उंबार्ली गावच्या टेकडीखाली तयार झाले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीसह रासायनिक सांडपाण्याचा तलाव तयार करण्यात आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस तलावाचा आकार वाढत असून प्रदूषण देखील वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून पर्यावरण विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उंबार्ली टेकडी परिसरातील वन्य जीवांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. काटई -खोणी महामार्गाच्या कडेला असलेल्या उंबार्ली टेकडीच्या पायथ्याशी उल्हासनगर शहरातून हकालपट्टी झालेले जीन्स कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांमधून निघणारा रासायनिक सांडपाणी थेट वन विभागाच्या जागेत तलाव तयार करून जमिनीत मुरवला जात आहे.
यामुळे परिसरातील वन्यजीव सृष्टीसह पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण महामंडळ या प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याने डोंबिवलीचा ऑक्सिजन झोन संकटात सापडला आहे. शासनाकडून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमां हाती घेतले जात आहेत.
डोंबिवली शहराला लागून असलेल्या उंबार्ली टेकडीवर मोठ्या प्रमाणात वन संपदा आहे. त्यामुळे या परिसरात अनेक वन्यजीवांची भटकंती दिसून येत आहे. पर्यावरण प्रेमी या भागात पर्यावरणाचा आनंद घेण्यासाठी देखील येत आहेत.
डोंबिवली शहरासह दावडी, सोनारपाडा परिसरात नागरिक सकाळच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी उंबार्ली टेकडीवर येत असतात. या टेकडीवर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र या परिसरातील पर्यावरणाला दुर्गंधीची कीड लागल्याने शासकीय यंत्रणा कारवाई सोडून गेल्या कुठे? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडला आहे.
पर्यावरणाची हानी
काटई-खोणी महामार्गाच्या कडेला असलेल्या उंबार्ली येथील जीन्स कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचा तलाव आहे. या तलावामधून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. मात्र हे प्रदूषणाचे प्रकार प्रदूषण नियंत्रण महामंडळासह वनविभाग देखील पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या हानीस कारणीभूत ठरणारे कारखाने प्रशासनाच्या निदर्शनास कधी येणार? हे महत्वाचे ठरणार आहे.