डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या निळजे गावाजवळच्या लोढा हेवन गृहसंकुल परिसरातील भुयारी गटारात चार-पाच महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आला. मानपाडा पोलिसांनी मृत अर्भक भुयारी गटारात फेकून देणाऱ्या अज्ञात माता-पित्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
निळजे गावातील गृहसंकुलात राहणाऱ्या एका सेवानिवृत्ताने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास ढोले यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केल्यानंतर अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला. हा मृतदेह चंद्रेश मेमोरिअल शाळेसमोर असलेल्या भुयारी गटारात आढळून आला होता. सदर अर्भक स्त्री की पुरूष जातीचे आहे हे उत्तरीय तपासणी अहवालातून स्पष्ट होणार आहे. अनैतिक संबंधातून जन्म दिलेल्या बाळाला अशा पद्धतीने फेकून दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे. कायदेशीर पालकत्व लपविण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोढा हेवन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हे कृत्य करणाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.