ठाणे

Dombivli News : उल्हास नदीच्या वेगवान प्रवाहात १६ वर्षीय मुलगा बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या वेगवान प्रवाहात मोहिली येथील १६ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मोहीम सुरू आहे.

कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली ते टिटवाळा स्टेशनदरम्यान असलेल्या मोहिली/बल्याणी परिसरातील आदिवासी पाड्यात राहणारा यशवंत वाघे (१६) हा शुक्रवारी सकाळी नदीकाठी गेला होता. नदीकाठी उभा असतानाच अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि यशवंत पाण्यात ओढला जाऊन वाहून गेला. बराच वेळ झाला तरी यशवंत घरी न परतल्याने कुटुंबीयांसह पाड्यातील रहिवाशांनी नदी परिसरात शोध घेतला; मात्र तो सापडला नाही.

त्यानंतर ही माहिती तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पथक मोहिली येथील उल्हास नदीकाठी दाखल झाले. बचाव पथकाने बोटींच्या मदतीने नदीत शोधकार्य सुरू केले आहे. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत. शुक्रवारी दिवसभर हे शोधकार्य सुरू होते.

स्थानिक ग्रामस्थांनी मोहिली आणि पुढील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीत मुलगा आढळून आल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीकाठची जमीन भुसभुशीत झाली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यावर दलदलीच्या भागातून बाहेर पडणे कठीण होते, असे स्थानिकांनी सांगितले. पाण्यासोबत मासे आणि खेकडे वाहून येत असल्याने नदीकाठी नागरिकांची गर्दीही वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आणि विशेषतः लहान मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT