ठाणे

Dombivli News : डोंबिवलीजवळच्या शिरढोणमधील म्हाडाच्या इमारतीवरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीजवळ असलेल्या शिरढोण येथील म्हाडाच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान अपघात घडला असून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवव्या मजल्यावरील स्वयंपाकघरात लोखंडी जाळी लावून सिमेंट भरणीचे काम करत असताना तोल जाऊन हा मजूर थेट डक्टमधून जमिनीवर कोसळला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

श्यामसुंदर पृथ्वीपाल (२८) असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बांधकाम कंपनीचा ठेकेदार तनजील आलम याच्यासह सुरक्षा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरढोण येथे बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडाच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे.

गेल्या दीड वर्षांपासून श्यामसुंदर या कंपनीत सेंटरिंगचे काम करत होता. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे काम सुरू असलेल्या १५ क्रमांकाच्या इमारतीत सहकाऱ्यांसह आला. या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील सदनिका क्रमांक ९०४ मध्ये त्याचे काम सुरू होते. या सदनिकेच्या स्वयंपाकघरातील पडद्यांच्या सेंटरिंग व काँक्रिटचे काम करत असताना श्यामसुंदरचा अचानक तोल गेला आणि तो डक्टमधून थेट जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती तातडीने ठेकेदाराला देण्यात आली. जखमी श्यामसुंदरला ठेकेदार आणि इतर कामगारांनी काटई येथील एमजीएम रुग्णालयात नेले; तेथून त्याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. ठेकेदार तनजील याने श्यामसुंदर याला शिरस्त्राणासह इतर सुरक्षा साधने देणे बंधनकारक होते; परंतु ही साधने न पुरवल्यामुळेच श्यामसुंदरचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हायड्रा चालक प्रमोद प्रसाद यांनी दिलेल्या जबाबावरून मानपाडा पोलिसांनी ठेकेदार आणि कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT