File Photo
ठाणे

Dombivli Crime : डोंबिवली हादरली! प्रगती कॉलेजमध्ये भरदिवसा शिपायाची चौथ्या मजल्यावरून उडी; पालकांसमोरच संपवलं जीवन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या दत्तनगर परिसरातील प्रगती कॉलेजमध्ये गुरूवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या एका शिपायाने कॉलेज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपविले.

प्रवीण चौधरी (४२) असे मृत शिपायाचे नाव असून ते ठाकुर्ली जवळच्या खंबाळपाडा परिसरात राहत होते. गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील प्रगती कॉलेजमध्ये लायब्ररी शिपाई म्हणून कार्यरत होते.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी सुमारे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण चौधरी हे आपल्या आई-वडिलांसह कॉलेजमध्ये प्राचार्यांशी काही कारणास्तव चर्चा करण्यासाठी आले होते. प्राचार्यांच्या कार्यालयात चर्चा सुरू असताना अचानक त्यांनी कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीकडे धाव घेतली आणि क्षणार्धात खाली उडी घेतली. ही घटना झटपट घडल्याने उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीण यांना तात्काळ रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण चौधरी यांचा स्वभाव तापट असल्याची माहिती समोर आली आहे. कामाच्या वर्तनाबाबत कॉलेज प्रशासनाकडून यापूर्वीही त्यांना अनेकदा समज देण्यात आली होती. या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना कॉलेजमध्ये बोलाविण्यात आले होते. चर्चेदरम्यान प्रवीण यांना अचानक राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर कॉलेज परिसरात खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT