डोंबिवली : येथील पूर्व भागातील गजबजलेल्या संत नामदेव पथावर रविवारी (दि. २५) दुपारी भीषण आगीची घटना घडली. 'लक्ष्मीनारायण' इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील एका घराला अचानक आग लागून घरातील सर्व संसार जळून खाक झाला. सुदैवाने, आग लागली तेव्हा घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या दुर्घटनेत घरमालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास घरमालक चंद्रशेखर बागायतदार हे आपल्या घराला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर पडले होते. ते गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बंद घरातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने इमारतीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विलंब न लावता अग्निशमन दल आणि टिळकनगर पोलिसांना पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून काही तासांतच आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत घरातील फर्निचर, कपडे आणि महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.