Dombivli News  
ठाणे

Dombivli News | मद्यपान करुन राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्याला पकडून मनसैनिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात!

डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, संबधित परप्रांतिय

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मद्यपान करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना समाज माध्यमांद्वारे अश्लील भाषेत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्याला मनसैनिकांनी चांगलाच तडाखा दिला आहे. मनसेच्या डोंबिवलीतील सैनिकांनी पोलिसांच्या मदतीने पकडले आणि त्या इसमाच्या विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि मराठी अस्मिता याविषयी कोणीही काहीही वाकडे बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला सरळ करण्याची ताकद मनसे कार्यकर्त्यांत आहे, असा इशारा यावेळी मनसैनिकांनी दिला.

    मुंबईत सुरू असलेल्या एका प्रकरणावरून आणि मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादंगावरून भाविक गडा हा इसम समाज माध्यमांत मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवीगाळ करत असल्याचे मनसेचे कल्याण लोकसभा सचिव राहूल कामत, विधानसभा सचिव अरूण जांभळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतेक देशपांडे, उपशहराध्यक्ष दीपक शिंदे, विभागाध्यक्ष कदम भोईर, चेतन म्हात्रे, रितेश म्हात्रे, ऋतिकेश गवळी, उपविभागाध्यक्ष समीर भोर, शाखाध्यक्ष विनायक मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्‍यांनी त्‍याला समज देण्याचा प्रयत्‍न केला.

तरीही तो ऐकण्यास तयार नव्हता

कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर राज ठाकरे यांच्या विषयी सुरू असलेला प्रकार रामनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठांच्या निदर्शनास आणला. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा मनसे पध्दतीने या इसमाला धडा शिकवतील. अशी भूमिका मनसेचे राहूल कामत, अरूण जांभळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घेतली. हा विषय अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हालचाली करून तांत्रिक माहितीच्या आधारे समाज माध्यमांवर राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाविक गडाचा पत्ता शोधून त्याला ताब्यात घेतले.

पुन्हा गरळ ओकल्यास खळ...खट्याक्

पोलिसांनी भाविक गडा याला ताब्यात घेताच राजसैनिक आक्रमक झाले. या इसमाने समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली. मनसेचे कल्याण लोकसभा सचिव राहूल कामत (५३) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT