Dombivli News | निवडणूक प्रशिक्षणाकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका ! 
ठाणे

Dombivli News | निवडणूक प्रशिक्षणाकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका ! ८० जणांवर थेट फौजदारी कारवाई

कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी  आयोजित केलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या डोंबिवली जवळील पलावा गृहसंकुल परिसरात असलेल्या पवार पब्लिक स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसांनी या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे कामकाज पारदर्शकरितीने सुरळीत आणि विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी शासकीय, निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शाळा/महाविद्यालयांच्या आस्थापनांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित केली आहे.

निवडणूक कामकाजाकरिता डोंबिवली जवळील पलावा गृहसंकुल परिसरात असलेल्या पवार पब्लिक स्कूल या शाळेतील एकूण ८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज करण्याकरिता आदेश बजावण्यात आले होते. तसेच संबंधितांना वेळोवेळी मोबाइलद्वारे संपर्क साधून निवडणूक कर्तव्यावर हजर होण्याकरिता कळविण्यात आले होते. असे असतानाही सदर शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय निवडणूक कामकाजासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणास हे कर्मचारी उपस्थित राहिले नाहीत.

त्यामुळे निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी पवार पब्लिक स्कूल या शाळेतील ८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीला अनुसरून पोलिसांनी सदर कर्मचाऱ्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली.

दरम्यान येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी, तसेच दुसऱ्या दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी असलेल्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी या पार्श्वभूमीवर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT