डोंबिवली : डोंबिवलीजवळील नामांकित कासारिओ पलावा सिटीमध्ये सुरक्षेच्या नियमांवरून झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहनावर सोसायटीचे अधिकृत ओळखपत्र स्टिकर नसल्याने गेटवर अडवणाऱ्या वयोवृद्ध सुरक्षा सुपरवायझरला एका रहिवाशाने चपलेने मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी संबंधित रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पलावा सिटीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनावर सोसायटीचे अधिकृत ओळखपत्र स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, एका रहिवाशाचे वाहन स्टिकरशिवाय गेटवर आले असता तेथे कर्तव्यावर असलेल्या वयोवृद्ध सुरक्षा सुपरवायझरने वाहन अडवत नियमांची माहिती दिली. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशाने सुरुवातीला शिवीगाळ करत वाद घातला.
वाद वाढत गेल्यानंतर संबंधित व्यक्तीने थेट आपल्या पायातील चप्पल काढून ऑन-ड्यूटी सुपरवायझरला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इतर सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर पलावा सिटीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आम्ही रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नियम पाळतो, पण त्याबदल्यात अपमानास्पद वागणूक मिळते,” अशी भावना अनेक सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केली. किमान वेतनावर दीर्घकाळ उभे राहून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हात उचलणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पीडित सुरक्षा सुपरवायझरच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात संबंधित रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पलावा सिटी ही डोंबिवली परिसरातील सर्वात मोठ्या आणि हायप्रोफाईल टाऊनशिपपैकी एक मानली जाते. मात्र, काही रहिवाशांकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन, सुरक्षा रक्षकांशी अरेरावी आणि दबाव टाकण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप होत आहे.
“सोसायटीचे नियम सर्वांसाठी समान असताना काही जण स्वतःला व्हीआयपी समजून नियम धाब्यावर बसवतात,” अशी नाराजी सामान्य रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.