डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव परिसरात खेळायला गेलेल्या अवघ्या साडेचार वर्षीय चिमुरडीचा खाडी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मृत बालिकेचे नाव आरोही अविनाश टुकरूल (वय ४ वर्षे ६ महिने) असे असून ती मोठागाव स्मशानभूमी रोडवरील स्वामी समर्थ मठाच्या मागील कालकाई माता चाळीत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोही ही नेहमी घराजवळील मोठागाव खाडीकिनारी खेळण्यासाठी जात असे.
गुरुवारी (दि. २२) ती घरातून कुणालाही न सांगता खेळायला गेली. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री सुमारे १०.३० वाजता तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ती खाडी पात्रात पडलेली आढळून आली.
तिला तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. प्राथमिक तपासात खेळताना तोल जाऊन चिमुरडी खाडीत पडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे मोठागाव परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खेळता खेळता क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांना खाडी, नाले किंवा धोकादायक परिसरात एकटे खेळायला सोडू नये. पावसाळ्याच्या काळात अशा परिसरात विशेषतः सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.