डोंबिवली : सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेलेल्या एका तरुणाचा डोंगरचढाई दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील ऐतिहासिक इरशाळवाडी येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या रितेश कोणका (वय २०) या डोंबिवलीकर तरुणावर काळाने झडप घातली. ऐन उमेदीच्या काळात रितेशचा असा दुर्दैवी अंत झाल्याने डोंबिवलीच्या कोपर परिसरात आणि गिर्यारोहक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील कोपर परिसरात राहणारा रितेश आपल्या काही गिर्यारोहक मित्रांसोबत रविवारी (११ मे) इरशाळवाडीच्या मोहिमेवर गेला होता. कडा चढत असताना अचानक रितेशला चक्कर आली आणि तो कोसळला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला तातडीने शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पाणी पाजले आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवण्याची धडपड सुरू केली. मात्र, निसर्गाच्या या आव्हानासमोर रितेशची झुंज अपयशी ठरली.
खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि प्रभारी पोलीस विशाल पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली आणला व शवविच्छेदनासाठी पाठवला.
सध्या महाराष्ट्रात सूर्याचा पारा चढलेला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अतिउष्णता किंवा हृदयविकाराचा झटका हे रितेशच्या मृत्यूचे कारण असू शकते, असा काहींचा अंदाज आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर गिर्यारोहकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या उष्णतेच्या लाटेत दुपारी १२ ते ४ या वेळेत चढाई करणे पूर्णपणे टाळावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी पाणी, ORS आणि ग्लुकोजचे सतत सेवन करावे. मोहिमेवर जाताना प्राथमिक उपचारांचे किट सोबत असणे अनिवार्य आहे. दुर्गम भागात जाताना स्थानिक वाटाड्या किंवा ग्रामस्थांशी संपर्क ठेवावा.