डोंबिवली : जुन्या वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसान तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील तेलकोसवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली आहे. साहिल राजू गायकवाड (२६) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हर्षद गिरी (२०) याला अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार साहिल गायकवाड आणि संशयित तरुणांमध्ये यापूर्वीही वाद झाला होता. रविवारी झालेल्या भांडणानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला. सोमवारी रात्री साहिलला फोन करून तेलकोसवाडी परिसरात बोलावण्यात आले. त्यानंतर साहिल आणि संबंधित तरुणांची भेट झाली.
यावेळी जुन्या वादावरून त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. रात्री ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास जन गण मन शाळेबाहेरील रस्त्यावर हा वाद अधिकच चिघळला. तक्रारीतील माहितीनुसार काही तरुणांनी साहिलला बेदम मारहाण केली. याचदरम्यान त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
साहिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे तेलकोसवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला. या प्रकरणी सहा हल्लेखोरांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित संशयितांचा सहभाग आणि हत्येमागील नेमके कारण याबाबत पोलिस सखोल तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.