डोंबिवली : डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्यानेच शेजाऱ्याची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रताप चौधरी याचा जागीच मृत्यू झाला. तर हत्येनंतर मारेकरी रोहित शेलार फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, खंबाळपाडा येथे राहणाऱ्या चौधरी आणि शेलार या दोन कुटुंबांमध्ये घराच्या बांधकामावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी हा वाद विकोपाला गेला आणि रोहित शेलार याने प्रताप चौधरी याच्यावर शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतापचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून मारेकरी रोहित शेलार याने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. खुन्याला पकडण्यासाठी टिळकनगर पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान या घटनेनंतर खंबाळपाडा परिसरात तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे स्थानिक रहिवासी पुरते हादरले आहेत.