डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य उपक्रमातील डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील ऑन ड्युटी दोन डॉक्टर आणि दोन परिचारिकांना शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालयात घुसून शिवीगाळ आणि मारहाण केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रूग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
सोमवारी एक महिला प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल झाली होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी नातेवाईकांना सल्ला दिला. नवजात बाळाला एनआयसीयु म्हणजे नवजात शिशु अतिदक्षता विभागात उपचारांची गरज भासू शकते. मात्र शास्त्रीनगर रुग्णालयातील एनआयसीयु विभागातील बेड्स पूर्ण भरलेले असल्याने जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब दुसऱ्या रूग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी दिला.
मात्र नातेवाईक याच रूग्णालयात जागा करण्याची विनवणी करत होते. मात्र जागा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी शास्त्रीनगर परिसरातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. नगरसेवकांनी डॉक्टरांना फोन केला असता डॉक्टर रूग्णसेवेत असल्याने प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर रात्री नगरसेवक म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते रूग्णालयात आले. कोणतीही विचारणा न करता डॉ. साळुंखे आणि डॉ. बाविस्कर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉ. साळुंखे गंभीर जखमी झाले. बचावासाठी आलेल्या परिचारिका उबाळे आणि गिरी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. जाताना ड्युटी संपवून बाहेर पडा, तुम्हाला बघून घेऊ, अशीही धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी रात्रीच रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी ही माहिती आयुक्त अभिनव गोयल यांना दिली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्यासह मारहाण झालेले डॉक्टर आणि कर्मचारी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गेले. सोमवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारपासून रूग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे बाह्य रूग्ण विभाग पूर्णपणे बंद होता. या प्रकरणाचा अहवाल प्रशासनाने मागवला असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली. वैद्यकीय संघटनांच्या शिष्टमंडळानेही आयुक्तांची भेट घेऊन रूग्णालयातील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी केली.
वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. रूग्णालयातील दुरावस्था, बेड्सची कमतरता, रूग्ण आणि नातेवाईकांचा होणारा छळ यामुळे निर्माण होणारा तणाव आणि त्यातून होणारे वाद यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही यानिमित्ताने पुढे आली आहे. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या संतापाचा कडेलोड याच कारणांमुळे झाला. नेहमीच रूग्णांना कळवा, ठाणे किंवा मुंबईच्या रूग्णालयांची वाट दाखविली जाते. या दूरच्या प्रवासात रूग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अशा प्रश्नांचा भडिमार करत नगरसेवक म्हात्रे यांनी उपस्थित डॉक्टरांना जाब विचारला.
मात्र उडवाउडवीच्या उत्तरांमुळे नगरसेवक मात्रे यांचा पारा चढला आणि पुढील घटना घडल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. दरम्यान एकीकडे रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला खपवून घेतला जाणार नाही. सुरक्षा आणि पायाभूत सुविधा वाढवाव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. तर दुसरीकडे अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शास्त्रीनगर रूग्णालयातील घटना प्रकरणी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आम्ही डॉक्टर, सिस्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून आपात्कालीन परीस्थितीत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले असल्याचे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.