डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात सुरू असलेल्या गटारे आणि रस्त्यांच्या बांधकामातील निष्काळजी कारभारामुळे या भागातील रहिवाशांमध्ये असंतोष खदखदत आहे. एखाद्या दिवशी याच असंतोषाचा भडका उडून मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता असतानाच तत्पूर्वी धोकादायक आणि दर्जाहीन कामे करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या संदर्भात मिलापनगर परिसरातील रहिवासी एकवटले असून डोंबिवली एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांचे लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे.
मिलापनगर वेल्फेअर असोसिएशनमार्फत रहिवाशांनी दिलेल्या तक्रारींवरून या भागात सुरू असलेल्या गटारांची बांधणी अत्यंत निकृष्ट व अव्यवस्थित पद्धतीने होत आहे. सरळ रेषेत काम न करता झिगझॅग पद्धतीने गटारे तयार केली जात असून त्यांच्या रूंदीतही एकसारखेपणा नाही. त्यामुळे भविष्यात पावसाळी दिवसांत पाण्याच्या निचऱ्याची समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण होणार आहे. तसेच कामाचे नियोजन न करता कॉंक्रिट रस्ते वारंवार तोडले जात असल्याने त्याचा फटका रहिवाशांना बसत आहे.
कामाच्या ठिकाणी माती व राडारोड्याचे ढीग, तसेच उघडेक खंदक ठेवण्यात येत असून कोणतीही सुरक्षित उपाययोजना केली जात नाही. एमआयडीसीच्या कंत्राटदारांचे पर्यवेक्षक किंवा संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत नसल्याने कामाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याकडे रहिवाशांनी त्यांच्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे निष्काळजीपणाचे दुष्परिणामही समोर आले आहेत. २ एप्रिल रोजी गटाराच्या बांधकामादरम्यान महानगर कंपनीच्या पाईपलाईनला धक्का लागून गॅस गळतीची घटना घडली होती. तर त्याच दिवशी विद्युत पुरवठा करणारी केबल तुटल्याने संपूर्ण परिसरात आठ तासांहून अधिक काळ या भागात बत्ती गुल झाली होती.
कामांची गुणवत्ता ढासळल्याने वारंवार दुर्घटना
यापूर्वीही अशाच प्रकारामुळे ट्रान्सफॉर्मर बाधित होऊन दीर्घकाळ विद्युत पुरवठा ठप्प झाल्याची घटना घडली होती. कामांची गुणवत्ता पुरती ढासळल्याने वारंवार अशा घटनाघडत असतात. परिणामी अशा घटनांमुळे रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, कामांची गुणवत्ता तपासावी आणि देखरेख करण्यासाठी प्रभावी यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी रहिवाशांनी त्यांच्या तक्रारीत केली आहे. आता या संदर्भात एमआयडीसी प्रशासन काय निर्णय घेते याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.