डोंबिवली : कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या काँक्रीटच्या नव्या रस्त्यांना जणू नजर लागली आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1 मधील श्रीजी लाईफस्टाईल कंपनीचा समोर सुस्थितीत असलेला नव्याने बांधलेला काँक्रीटचा रस्ता तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कुठेही तडे वा खड्डे नसलेला हा रस्ता तोडण्यात का येत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य रहिवाशांसह उद्योजकांना पडला आहे. तथापि रस्ता तोडण्याचे कारण विचारले असता माहीत नसल्याचे सांगण्यात येते.
डोंबिवली एमआयडीसीतील दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी 110 कोटी 30 लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. एमआयडीसी आणि एमएमआरडीए या संस्थांच्या 50/50 टक्के भागादारीत ही कामे केली जाात आहेत. या कामांसाठी एमएमआरडीएने 57 कोटी 37 लाखाचा निधी अनुदान स्वरूपात केडीएमसीला दिला आहे. या निधीतून निवासी विभागातील 13 किमी रस्त्यांची, तर एमएमआरडीएकडून दिलेले 45 कोटी 30 लाख रुपये औद्योगिक क्षेत्रातील 11 किमी लांबीच्या रस्त्यांसाठी एमआयडीसीकडून खर्च करण्यात येत आहेत.
एमआयडीसीच्या फेज 1 व 2 मधील हे रस्ते 2/3 वर्षांपूर्वी एमआयडीसीकडून बांधले होते. परंतु यातील काही रस्ते पूर्ण तोडण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत एमआयडीसी अधिकार्यांना विचारले असता असता हे रस्ते जुने व खराब झाल्याने नवीन रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
एमआयडीसीमध्ये काही रस्ते अतिशय खराब झाले आहेत. असे रस्ते नव्याने बांधण्याची आवश्यकता असतानाही ते बांधण्यात का येत नाहीत? तसेच नवीन काँक्रीट रस्त्यांची गॅरंटी ठेकेदाराकडून घेतली नव्हती का? आदी प्रश्न उपस्थित केले असता एमआयडीसीचे अधिकारी यावर काहीही बोलत नाहीत.
सर्वसामान्य जनतेकडून वसूल केलेल्या वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीचा विनियोग उधळपट्टीसाठी केला जात असल्याचे यातून दिसून येते. यावर डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी चिंता व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिक हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी शांतपणे पाहत असल्याने त्याचाच गैरफायदा राजकारण्यांसह शासन/प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य घेत असल्याचा गौप्यस्फोट राजू नलावडे यांनी केला.