डोंबिवली : एमआयडीसीचा निवासी विभाग वृक्षवल्लीने नटलेला आहे. असंख्य वृक्षांनी बहरलेला हा परिसर कृत्रिम आपत्तीमुळे आता बोडका होऊ लागला आहे. प्रदूषणाला रोखण्यासह वातावरणात थंडावा आणि सावली देणाऱ्या वृक्षवल्लीला मानवनिर्मित आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे.
रस्ते आणि गटारांसह अन्य सार्वजनिक कामासाठी खोदकाम करताना आतापर्यंत शेकडो झाडांचा बळी गेला आहे. त्यात शुक्रवारी (दि.7) दुपारच्या सुमारास गुलमोहराची भर पडली आहे. रस्त्याच्या कडेला नवीन गटारासाठी खोदकाम सुरू असतानाच जेसीबीच्या धक्क्याने सुंदर असा भलाथोरला गुलमोहर उन्मळून पडल्याने परिसरातील रहिवाशांसह निसर्गप्रेमी पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील सर्व्हिस रोड अर्थात सेवा रस्त्याला असलेल्या मोनालिसा सोसायटीजवळ शुक्रवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. नवीन गटारासाठी खोदकाम करताना जेसीबीचा धक्का लागून हे झाड रस्त्यावर आडवे झाल्याने या रस्त्यावरील वाहतुक जवळपास दीड तास बंद पडली होती. गटाराचे बांधकाम करणाऱ्या एमआयडीसीच्या ठेकेदाराने हे झाड कापून रस्त्याच्या बाजूला केले. वास्तविक पाहता सार्वजनिक ठिकाणी एखादे झाड पडल्यावर अग्निशामक दलाला पाचारण करावे लागते. त्यानंतर जवान पडलेले झाड तोडून बाजूला करून रस्ता वाहतूक/रहदारीसाठी मोकळा करून देतात. मात्र ठेकेदाराने अग्निशामक दलाला न कळविता एमआयडीसीच्या ठेकेदाराने स्वत:च्या मजुरांकडून रस्त्यावर आडवे झालेले झाड तोडून बाजूला केले. त्यामुळे या कामासाठी वेळ लागल्याने दीड तासाहून अधिक काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
यापूर्वीही गटारे, नाले आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांची कामे करताना एमआयडीसीच्या ठेकेदारांकडून अनेक झाडांचा बळी गेला आहे. जीवघेण्या प्रदूषणाचा मुकाबला करण्यासह वातावरणात थंडावा निर्माण करणाऱ्या वृक्षवल्लीचा या भागातील साऱ्यांना फायदा होत आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरात प्रदूषणाची समस्या गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून भेडसावत आहे. जीवघेण्या प्रदूषण समस्येवर उपायोजना म्हणून ऑक्सिजन देणारी वड, पिंपळ, बदाम, आंबा, नागकेसर, शिसम, चेरी, पेरू, उंबर, फणस, बहावा, करंज, कडूनिंब, बकुळ, चिंच, अशा विविध प्रकारची झाडे या भागातील रहिवाशांनी तीस-चाळीस वर्षांपूर्वी लावली आहेत. या झाडांनी आता महाकाय वृक्षांचे स्वरूप धारण केले आहे. आता हीच वृक्षवल्ली मानव निर्मित आपत्तीमुळे माणसाच्या मुळावर उठल्याची चिंता डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी व्यक्त केली.