डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा भागात असलेल्या कंपनीच्या मालकाने एका महिलेला त्याच्या कंपनीत स्वीय सहाय्यक पदावर नेमणूक केली. ही नेमणूक करताना मालकाने महिलेला हे पद सांभाळण्यासह माझ्याशी शरीर संबंध ठेवावे लागतील असे सांगितले. घडल्या प्रकाराबद्दल संतापलेल्या महिलेने रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन कंपनी मालकाच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार महिला डोंबिवली परिसरात राहणारी असून ती खासगी ठिकाणी नोकरी करते. तर 25 वर्षीय आरोपी हा कंपनीचा मालक असून तो पंजाबी असल्याचे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपीची कंपनी कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या सोनारपाडा भागात आहे. गेल्या महिन्यात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फोनवरील बोलण्यातून हा प्रकार घडला आहे. घडल्या प्रकाराविषयी महिलेने बुधवारी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. मालकाचा शोध सुरू केला आहे. अद्याप आरोपी अद्याप हाती लागला नसून पोलिस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.