डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : ॲल्युमिनियम आयसोप्रॉक्साईड, मिथी इथील केटोन पॅरॉक्साईड, ब्युटेल पेरबेन्झोट, डाय मिथिल पायथॉलेट, टरसरी ब्युटेल हायड्रो पॅराऑक्साईड, टरसरी ब्युटीन पियोलेट, कमेन हायड्रो पॅराऑक्साईड, बेन्झाल पॅराऑक्साईड, टरसरी ब्युटेल ऑकेट या केमिकलचे उत्पादन आणि त्यांची प्रक्रिया करणारी अमुदान कंपनी रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटात जळून खाक झाली आहेत. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२४) रोजी दुपारी कालिन्याहून फॉरेन्सिक लॅब अर्थात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे ६ जणांचे पथक दुर्घटनास्थळी दाखल झाले.
या पथकाने पोलिसांच्या मदतीने स्फोट झालेल्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर स्फोटात क्षतिग्रस्त झालेले अवशेष, केमिकलच्या ट्यूब, बॉटल, उध्वस्त झालेल्या मशिनरीत अडकलेले केमिकल, मानवी अवशेष आदी संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या. या सर्व अवशेष आणि वस्तूंची कालिन्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सूक्ष्म तपासणी (डीएनए टेस्ट) करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेच्या अहवालातून स्फोटाचे धागे-दोरे हाती लागण्याची शक्यता आहे. इतका शक्तिशाली स्फोट नेमका कशामुळे झाला? याचे सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमुदान कंपनीच्या स्फोटाचा परिणाम दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील जाणवत होता. दुर्घटनास्थळी अद्यापही आग काही अंशी प्रमाणात धुमसत आहे. अधून-मधून किरकोळ स्फोट सुरू होत आहेत. कंपनीचा सिमेंटचा स्लॅब अद्याप उचलेला नाही. या स्लॅबखाली मानवी अवशेष सापडण्याची शक्यता अग्निशामक दलाकडून वर्तविण्यात आली. तीन किलोमीटर परिसरातील इमारती, व्यापारी संकुले, निवासी इमारती, विजेचे खांब, या कंपनी लगतच्या तीन ते चार कंपन्यांची अतोनात नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, स्फोटापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या टेम्पो नाक्यावरील गणपती मंदिराला थोडाही धक्का बसलेला नाही. ही बाप्पाची किमया असल्याचे नाक्यावरील टेम्पो चालकांनी सांगितले. तर याच रस्त्याच्या कडेला असलेल्या गणेश भुवन आणि त्याशेजारी असलेल्या वाहनांच्या गॅरेजचे अतोनात नुकसान झाले. विशेष म्हणजे, हॉटेलमधील मंदिर आणि काचेच्या फ्रेममध्ये असलेल्या नित्यानंद महाराजांच्या फोटोही धक्का बसला नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा