डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील निळजे गाव हद्दीत असलेल्या 'लोढा हेवन' संकुलात 'हेल्थ स्पा सेंटर'च्या नावाखाली कुंटणखाना चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेल) वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी या स्पा सेंटरवर छापा टाकून कुंटणखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, स्पा मालकिणीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
छाया उर्फ माया नवनाथ पालवे (वय ४७, रा. लोढा पलावा) असे अटक करण्यात आलेल्या मालकिणीचे नाव आहे. ती मूळची अहिल्यानगर (कोपरगाव) येथील रहिवासी असून, २०१७ पासून ती हे स्पा सेंटर चालवत होती. या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी तिने शंकर पप्पू चव्हाण (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) याला व्यवस्थापक म्हणून नेमले होते. या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाला या स्पा सेंटरमध्ये पाठवले. मसाजसाठी ३ हजार रुपये आणि शरीरसुखासाठी ५ हजार रुपये अशी मागणी मालकिणीने केली. बनावट ग्राहकाने ३ हजार रुपये रोख आणि ५ हजार रुपये ऑनलाइनद्वारे अदा केल्यानंतर, तरुणीसोबत खोलीत गेल्यावर त्याने पोलिसांना इशारा (मिस कॉल) दिला. त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने धाड टाकली.
छापा टाकल्यानंतर स्पा सेंटरमधील पाच खोल्यांमध्ये काही तरुणी आक्षेपार्ह आणि विस्कळीत अवस्थेत आढळल्या. या पीडित तरुणी मूळच्या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील असून, सध्या त्या नवी मुंबई, उल्हासनगर आणि नेवाळी भागात राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस पथकाने या तरुणींची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मालकीण छाया पालवे हिला अटक करण्यात आली आहे. मात्र, धाडीची चाहूल लागताच व्यवस्थापक शंकर चव्हाण याने तेथून पळ काढला. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, डी. के. वालगुडे, सहाय्यक उपनिरीक्षक व्ही. आर. पाटील आणि पोलीस अंमलदार दिनेश महाले, आर. यु. सुवारे, आर. के. भगत, पी. जी. खरात, एच. आर. थोरात व निकम यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.