Dombivli News | डोंबिवलीतील मानपाडा-स्टार कॉलनीकर धोक्याच्या उंबरठ्यावर 
ठाणे

Dombivli News | डोंबिवलीतील मानपाडा-स्टार कॉलनीकर धोक्याच्या उंबरठ्यावर

तुटलेल्या संरक्षक भिंतीसह उघड्या नाल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गाला जोडणाऱ्या मानपाडा रोडवरील मानपाडा नाका ते स्टार कॉलनी नाक्यादरम्यान असलेल्या या मुख्य मार्गावरील उघडा नाला आणि पडझड झालेली संरक्षक भिंत स्थानिक रहिवाशांसह पादचारी आणि वाहनचालकांसाठी धोकादायक बनली आहे. शासन/प्रशासनाचा जबाबदार विभाग, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा परिसर मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का ? असा सवाल या भागातील स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

  या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी पावसाळ्यात नाल्याची संरक्षक भिंत कोसळली होती. तेव्हापासून आजपर्यंत ना तिची दुरुस्ती झाली, ना नव्याने बांधकाम करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह पादचारी आणि वाहचालकांसाठी धोकादायक होऊ शकतो. हा नाला पावसात पूर्ण भरून वाहतो. अनेकदा तर नाल्यातील सांडपाणी मुख्य रस्त्यावर येऊन सर्वत्र पसरते. सुरक्षेसाठी बांधलेली भिंत तुटल्यानंतर नाल्याचा उघडा भाग थेट रस्त्याला लागून आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता आणखी वाढली आहे. त्यातच रस्त्याची खोदाई आणि अव्यवस्थेमुळे समस्यांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर इंटरनेट कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी खोदकाम केले होते, ज्यामुळे सिमेंटचा रस्ता खराब झाला आहे. खोदकामानंतर माती रस्त्याच्या कडेला तशीच पडून आहे.

पावसाआधी दुरूस्तीची मागणी

या रस्त्याने परिसरातील पालक आपल्या विद्यार्थ्यांसह ये-जा करत असतात. शिवाय पादचारी आणि वाहनांची वर्दळ नेहमीच असते. केडीएमसीच्या दुर्लक्षामुळे मृत्यूचा सापळा ठरलेला हा उघडा नाला साऱ्यांसाठी धोकादायक ठरला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर उघडा पडलेला नाला आणि पडझड झालेल्या भिंतीची वेळीच दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT