सापाड : टाटा पॉवर नाका परिसरातील गांधी नगरजवळ एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका 60 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबू धर्मा चव्हाण असे मृत इसमाचे नाव असून, ही घटना कल्याण-शिळ रोडवरील नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
प्राथमिक माहितीनुसार बाबू चव्हाण हे रस्त्याने चालत असताना त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते थेट एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ त्यांना डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या भागातील रहिवाशांनी यापूर्वी अनेकदा रस्त्यावर असलेल्या उघड्या चेंबरबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र एमआयडीसीने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अपघातानंतर परिसरात संतप्त वातावरण पाहायला मिळाले. तर दोषी अधिकार्यांवर त्वरित कारवाई करावी.
सर्व उघडे चेंबर्स बंद करावेत आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या मृताच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी. कारण ही घटना केवळ एक अपघात नसून, सार्वजनिक सुरक्षेबाबतच्या ढिसाळ नियोजनाचे दुर्दैवी उदाहरण आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडू शकतात, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
वडिलांना वेळेवर योग्य पायाभूत सुविधा मिळाल्या असत्या, तर त्यांचा जीव वाचू शकला असता. हे दुर्लक्ष नव्हे तर थेट जीव घेणारी निष्काळजीपणा आहे.प्रवीण चव्हाण, मुलगा
आमच्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? आम्ही प्रशासनाकडे न्यायाची मागणी करतो. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.काशिनाथ चव्हाण, मुलगा
या अपघातास पूर्णपणे एमआयडीसी जबाबदार आहे. उघड्या चेंबर बाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष झालं. मी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहे.मोरेश्वर भोईर, माजी उपमहापौर (भाजप)