Local Train  pudhari photo
ठाणे

Dombivli News : चक्कर येऊन तरुणी पडली ट्रॅकवर, सिग्नलमुळे लोकल थांबली म्हणून वाचला जीव!

कामावरुन परतत असताना थांबलेल्या लोकलमधून पडली ट्रॅकवर, तरुणीला रेल्वे पोलिसांनी वाचवले

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान लोकलमध्ये प्रवास करत असताना अचानक चक्कर आल्याने २४ वर्षीय तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यावेळी सिग्नलमुळे लोकल थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांचे तरुणीकडे लक्ष जाताच त्यांनी तातडीने धाव घेत तिची सुटका केली.

    उल्हासनगर ३ येथील प्रीती संजय पाल ही २४ वर्षीय तरुणी कामावरून घरी परतत होती. रात्री ठाकुर्ली आणि कल्याणच्या दरम्यान सिग्नलमुळे लोकल थांबलेली असताना अचानक प्रीतीला चक्कर आली आणि तिचा तोल जाऊन ती रेल्वे ट्रॅकवर पडली. खाली पडताना तिच्या डोक्यासह चेहऱ्याला दुखापत झाली. मात्र सुदैवाने त्यावेळी लोकल सिग्नलमुळे थांबलेली असल्याने तरुणीचा जीव वाचला.

    दरम्यान कचोरे परिसरात गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचवेळी ट्रॅकवर पडलेल्या तरुणीकडे पोलिसांचे लक्ष गेले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत प्रीतीला ट्रॅकवरून उचलले आणि रिक्षाच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. सध्या प्रीतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT