ठाणे : डोंबिवली जवळील सोनारपाडा गावात बैलांची झुंज रविवारी पार पडली. झुंज पाहण्यासाठी शेकडो तरुण या जनावरांच्या जवळ ओरडत असताना दिसून आले आहेत. या अतिउत्साही प्रेक्षकांचा आणि बैलांच्या झुंजींचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. चक्क तमिळनाडूच्या जलीकट्टूला मागे टाकणारी स्पर्धा होती असे बोलले जात आहे. या स्पर्धेसाठी सुमारे आठ लाखांचे बक्षीस होते तर लाखोंचा सट्टा लागला होता , अशी आता चर्चा सुरु झाली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा गावात दोन बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल आणि कल्याणच्या सापाड गावच्या बैल सहभागी झाले होते. स्पर्धा स्पर्धेत प्रेक्षक बैलांची सुरू असलेली झुंज पाहत असताना त्यांच्यासमोर तरुणांई धिंगाणा घालताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान यापूर्वी सुद्धा अश्या स्पर्धांमध्ये दोन गटात राडे आणि अपघात देखील झालेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत असा प्रकार घडला असता तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे.
विशेष बाब म्हणजे नेहमी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सज्ज असणाऱ्या मानपाडा पोलिसांना या घटनेची कुणकुण देखील लागली नाही. पोलिसांना या स्पर्धेची माहिती होती की त्यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला असा प्रश्न यावरून उपस्थित झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारी थोपविण्यासाठी भर चौकात गुंडांना बडदवणारे पोलीस उपायुक्त काय कारवाई करतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.