डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या प्रसिद्ध इराणी काबिल्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांवर तुफान दगडफेक झाली. चोरीच्या गुन्ह्यात संशयित चोरट्याला उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर इराण्यांनी हिंसक हल्ला केला. काबिल्यातून ताब्यात घेतलेल्या साथीदाराला सोडविण्यासाठी केलेला दगडफेकीमध्ये एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
इराणी काबिल्यामध्ये पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या घटनांची पुनरावृत्ती बुधवारी रात्रीच्या सुमारास झाली. मुंबई एमआयडीसी पोलिसांनी तौफिक नावाच्या संशयित चोरट्याला इराणी काबिल्यातून ताब्यात घेतले होते. तौफिकला ताब्यात घेतल्याची वार्ता सर्वत्र पसरताच काबिल्यातील महिला आणि पुरूष, विशेषतः इराणी तरूण संतप्त झाले. तौफिक ताब्यात घेऊन पोलिस काही अंतरावर गेले असतानाच पाठलाग करत इराण्यांच्या हिंसक जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. अचानक दगडफेक झाल्याने पोलिसांनी थेट आंबिवली रेल्वे स्थानक गाठले. जमावाने पोलिसांचा पाठलाग करत रेल्वे स्थानकात उतरून पटरीवरील दगडांचा पोलिसांच्या दिशेने मारा केला. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हिंसक इराण्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस अधिकारी यशवंत पालवे गंभीर जखमी झाले. जखमी अधिकाऱ्याला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यापूर्वीही अनेकदा इराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ले झाले आहेत. या संदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्यात 25 हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून अन्य हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.