डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव रेतीबंदर खाडीकिनारी, मोठागाव-माणकोली उड्डाण पुलाच्या शेजारी सुरू असलेला वाळू तस्करांचा मोठा डाव महसूल विभागाने उधळून लावला आहे. कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला १५ ब्रास रेतीचा साठा महसूल विभागाने जागेवरच नष्ट केला.
मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे यांच्या पथकाने धाडसी छापा टाकून हा साठा जेसीबीच्या साहाय्याने थेट खाडीत ढकलून दिला. तसेच रेती साठवण्यासाठी तयार केलेले मोठे हौदही उद्ध्वस्त केले. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाळू तस्करांविरुद्ध जमीन महसूल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासणी दौरा : गेल्या आठवड्यात तहसीलदार विकास गरूडकर यांच्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे पथक मोठागाव रेतीबंदर परिसरात अवैध रेती उपशाची पाहणी करण्यासाठी गेले होते.
अवैध साठा आढळला : दुपारच्या सुमारास खाडीत थेट उपसा सुरू नसला, तरी मोठागाव-माणकोली पुलाच्या उत्तर व दक्षिण बाजूला वेगवेगळ्या भूखंडांवर वाळूचे मोठे ढीग रचल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
खतरनाक तपास : चौकशीदरम्यान तेथील १५० ब्रास रेतीचा साठा एका खाजगी कंपनीने रीतसर लिलावात घेतल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उर्वरित भूखंडांवरील १५ ब्रास रेतीचा साठा नेमका कोणाचा आहे, याची माहिती स्थानिक रहिवाशांना नव्हती आणि कोणीही त्याची मालकी सांगायला पुढे आले नाही.
जागेवरच विल्हेवाट : हा साठा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची खात्री पटताच महसूल विभागाने तात्काळ कारवाई केली. घटनास्थळी जेसीबी पाचारण करून संपूर्ण १५ ब्रास रेती पुन्हा खाडीत ढकलून देण्यात आली.
या प्रकरणी मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विष्णूनगर पोलिसांनी अज्ञात रेती माफियांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
बेकायदा वाळू उपसा आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. गेल्या ६ महिने ते १ वर्षात महसूल विभागाने मोठागाव, रेतीबंदर आणि कोपर भागात धडक कारवाया करून वाळू तस्करांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. उपशासाठी वापरली जाणारी महागडी सामग्री जाळून किंवा खाडीत बुडवून तस्करांचे आर्थिक कंबरडे मोडण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत डोंगर-दऱ्यांतून मातीमिश्रित वाळू मोठ्या प्रमाणात वाहून येत असल्याने खाडी परिसरात अवैध उपसा वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन महसूल विभागाने या भागात आपली गस्त आणखी तीव्र केली असून, अशा अवैध कारवाया यापुढेही सुरूच राहतील, असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.