आनंदी कला केंद्रात अनेक गणेशमूतींचे काम अपूर्ण आहे.  Pudhari Photo
ठाणे

Dombivali News: बाप्पाच्या मूर्तीचे पैसे घेतले, चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्तिकार पसार; गणेश भक्तांमध्ये संताप

ऑर्डर पूर्ण न झाल्‍याने आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार गायब , गणेशोत्सवाच्या तोंडावर धक्कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असतानाच डोंबिवलीत आक्रित घडले. पश्चिमेतील महात्मा फुले रोडला असलेल्या आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याने गणेशभक्त मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गणेशमूर्तींची बुकिंग केली होती. मात्र ऑर्डर पूर्ण करता न आल्‍याने तो पळून गेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अनेकजण ठरवलेली मूर्तीचे पूजन कसे करायचे या विवंचनेत पडले आहेत. विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पसार झालेल्या मूर्तिकाराला हुडकून काढण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.

पश्चिम डोंबिवलीतील फुले रोडला आनंदी कला केंद्रात गणेशाच्या मूर्ती बनवून तेथेच त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी रात्रीपासून या केंद्राचा मूर्तिकार प्रफुल्ल परशुराम तांबडे अचानक बेपत्ता झाला. त्याच्या आनंदी कला केंद्रात मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गणेशमूर्तींची बुकिंग केली होती. मात्र जास्तीच्या ऑर्डर्स घेऊन एकट्याने काम करण्याचा भार पेलता न आल्याने तो पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकले आहे.

मूर्ती मिळावी म्हणून भाविकांना कारखान्यातून हाताला लागेल ती मूर्ती घेऊन जावी लागली. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच मंगळवारी सकाळी अनेक गणेशभक्त घटनास्थळी दाखल झाले. केंद्राचा चालक तथा मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे गायब झाल्याचे लक्षात येताच गणेशभक्तांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिनार ग्राऊंडवरील आनंदी कला केंद्राचा चालक प्रफुल्ल परशुराम तांबडे नामक मूर्तिकार गणपतीच्या मूर्ती तयार करून तेथेच विक्री करत होता. त्याने गणेश मूर्तीसाठी १५०१ रूपये ॲडव्हांस (आगाऊ) घेऊन बुक केलेल्या ३५०० रूपये किंमतीच्या गणेश मूर्तीचे काम पूर्ण करून न देता रक्कम घेऊन सदर रकमेच्या अपहार करून कुठेतरी पळून गेला. या संदर्भात मूर्तींच्या खरेदीदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णूनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१८ (२) अन्वये दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या प्रफुल्ल तांबडे याने अनेक गणेश मूर्तींचे काम अपूर्ण ठेवले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासला वेग दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT