ठाणे

Doctor Assault Case | डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण : हिंसाचाराला कारणीभूत चिथावणीखोर महिलेलाही अटक

शिवसेना नगरसेव रमेश म्हात्रेसह आरोपींची संख्या पोहोचली ५ वर

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : सोमवारी ६ जुलैच्या रात्री आठव्या सुमारास एका गर्भवती महिलेच्या उपचारावरून झालेल्या वादातून शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. रूग्णालयात घडलेल्या हिंसाचाराला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली आरोपींना चिथावणी देणाऱ्या साधना कारंडे या महिलेला विष्णूनगर पोलिसांनी रविवारी अटक केली.

   नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे खासगी अंगरक्षक असलेले रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे अशा चौघांवर गंभीर कलमांचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी अक्षयची आई साधना कारंडे हिने शास्त्रीनगर रूग्णालयातील डाॅक्टर आपणास योग्य सहकार्य करत नाहीत म्हणून रमेश म्हात्रे यांना बोलावून घेतले. म्हात्रे रूग्णालयात येताच साधना कारंडेने तेथील डाॅ. सृष्टी बाविस्कर आणि डाॅ. वैभव साळुंके यांच्याशी रमेश म्हात्रेंची बाजू घेत वाद घातला.

आरोपींना चिथावणी देऊन रूग्णालयात हिंसाचार घडण्याला कारणीभूत ठरलेल्या साधना कारंडे हिला विष्णुनगर पोलिसांकडून रविवारी अटक करण्यात आली. गुन्हा घडल्यापासून ही महिला मोकाट होती. या महिलेमुळे हे सर्व प्रकरण घडून आल्याने तिला अटक करावी यासाठी वैद्यकीय संघटना, शासकीय सेवेतील वैद्यकीय संघटना यांची मागणी होती. विष्णूनगर पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक चौकशीसाठी साधना कारंडेला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. साधना कारंडेच्या अटकेनंतर हिंसाचार प्रकरणातील आरोपींची संख्या आता ५ वर पोहोचली आहे.

डॉक्टरांविषयी काही तक्रार असेल तर चौकशी करा, तक्रार करा. पण कायदा हात घेऊन एकेरी भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्याचा अधिकार कुणालाही नाही. डाॅक्टरांवर हल्ले करणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी, डाॅक्टरांच्या संरक्षणाचे कठोर कायदे करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. त्यामुळे गुंड, लोकप्रतिनिधी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यास पुढाकार घेणार नाहीत.
– डॉ. महेंद्र बाविस्कर (पिडीत डाॅ. सृष्टीचे वडील)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT