डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासोबत रमेश लक्ष्मण पवार हा ५० वर्षीय साथीदारही सहभागी होता. रमेश पवार हा डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील वडारवाडी परिसरात राहत असून मर्डर केसमधला आरोपी असलेला हा साथीदार रमेश म्हात्रेच्या दावणीला गेल्या काही वर्षांपासून होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. हाच रमेश पवार केडीएमसीचा ठेकेदार असल्याची माहिती चौकशीदरम्यान उजेडात आली आहे.
आरोपी रमेश पवार हा नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून केडीएमसीची गटारे आणि पायवाटांची कामे करत असतो. पश्चिमेतील कोपर आणि शास्त्रीनगरसह डोंबिवलीच्या इतर भागात नगरसेवक निधी किंवा मुलभूत सोयी/सुविधांच्या निधीतून आलेली कामे आतापर्यंत करत आला आहे. काही वर्षांपूर्वी याच रमेश पवारला खुनाच्या गुन्ह्यात सहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाली होती.
शिक्षा भोगून सुटल्यानंतर त्याने पुन्हा रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून केडीएमसीची कामे मिळवली. यापूर्वी रमेश पवार मजूर कामगार सोसायटीच्या माध्यमातून कामे करत होता. तुरूंगवासामुळे त्याच्या कामात खंड पडला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याने पुन्हा कामे हाती घेतली होती. केडीएमसीकडून कामे मिळविण्यासह त्या कामांची देयके काढण्यापर्यंत प्रभाग कार्यालयांपासून मुख्यालयात त्याची सातत्याने ये-जा असल्याची माहिती केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. नगरसेवक रमेश म्हात्रेच्या शिफारशीच्या आधारे केडीएमसीकडून कामे मिळविणारा रमेश पवार डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. आता त्याने केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कामांच्या चौकशीची मागणी
आरोपी रमेश पवार याने सार्वजनिक ठिकाणी आतापर्यंत केलेल्या गटारे, पायवाटा आणि इतर मुलभूत सुविधांच्या कामांचा आयुक्त अभिनव गोयल यांनी दर्जा तपासावा. कामे निकृष्ट दर्जाची आढळल्यास त्याला दंड करून काळ्या यादीत टाकावे. तसेच त्याची प्रलंबित देयकेही रोखून धरावीत, अशीही मागणी विविध स्तरातून होत आहे. या माहितीला पुष्टी देताना केडीएमसीच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की रमेश पवार गेल्या काही वर्षांपासून कामे करत आहे. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या शिफारशींमुळे त्याला ही कामे मिळत गेली आहेत. नगरसेवक म्हात्रे यांच्या दांडगाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रमेश पवार याला कामे दिली जात असल्याचीही केडीएमसी वर्तुळात चर्चा सुरू आहे.